सप्टेंबर महिन्याच्या ९ व १० तारखेला राजधानी दिल्लीत G20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपस्थित राहणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलती समीकरणं व त्यात जी२० परिषदेतील देशांनी घ्यावयाची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. या बैठकीला आधी शी जिनपिंग येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता अचानक त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली असून त्यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचं सांगितलं जात आहे. रॉयटर्सनं प्रशासकीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

…म्हणून बैठकीकडे पाठ फिरवली?

दक्षिण आशियातील बदलती समीकरणं, भारत-चीन संबंध, रशिया-यु्क्रेन युद्ध अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, चीनच्या परराष्ट्र विभागाने नुकत्याच जारी केलेल्या देशाच्या नकाशात अक्साई चीन, लडाख व अरुणाचलचा काही भाग चीनच्या हद्दीत दाखवण्यात आल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना खोडा घातला गेला आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र विभागानं आपली नाराजी कळवली असली, तरी त्याचे पडसाद यंदाच्या जी२० परिषदेत उमटण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी बैठकीकडे पाठ फिरवण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

भारताला जी-२० परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या पार्श्वभूमीवर मिळाले?

जो बायडेन-जिनपिंग चर्चा प्रलंबित

दरम्यान, शी जिनपिंग यांच्या या निर्णयामुळे जी२० परिषदेत होऊ घातलेली जिनपिंग-बायडेन चर्चाही प्रलंबित झाल्याचं बोललं जात आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे प्रमुख गेल्या काही काळापासून तणावपूर्ण बनलेले व्यवसायविषयक मुद्दे हाताळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. याआधी थेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशांचे प्रमुख बालीमध्ये झालेल्या जी२० परिषदेच्या निमित्ताने एकमेकांना भेटले होते.

पुतिन यांची आधीच माघार!

एकीकडे शी जिनपिंग यांनी बैठकीतून आधीच काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनीही याआधीच आपण जी२० परिषदेला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्याऐवजी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये रशियाच्या युक्रेनमधील घुसखोरीविरोधातील संयुक्त निवेदनाला रशिया व चीन या दोन्ही देशांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या अनुपस्थितीकडे यासंदर्भात पाहिलं जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Xi jinping to skip g20 meeting in delhi next week with russia pmw