China New Prime Minister: गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये सत्तेत बदल होताना दिसत आहे. याचदरम्यान, ली कियांग चीनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत. झेजियांगचे राज्यपाल आणि कम्युनिस्ट पार्टीचे शांघाय प्रदेशाध्यक्ष राहिलेले ली कियांग हे शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. ली कियांग यांची राजकीय प्रतिमा व्यावसायिकधार्जिण राहिली आहे. त्यामुळे चीनच्या व्यवसाय क्षेत्रात मोठे बदल आगामी काळात पाहायला मिळू शकतात.
चिनी संसदेच्या नॅशनल पीपल्स पार्टीच्या ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या बैठकीत ली यांना नवीन पंतप्रधान म्हणून नामांकित करण्यात आले होते. चीनमध्ये सुरू असलेल्या टू-सेशन अधिवेशनात ली कियांग यांच्या नावावर नुकतेच शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे १० वर्षांपासून चीनच्या सत्तेतली क्रमांक २ ची खुर्ची सांभाळणारे ली केकियांग यांच्या कार्यकाळाला पूर्णविराम मिळाला आहे.
हे ही वाचा >> “गर्भवती सुनेला १५ तास बसवून ठेवलं”, ईडीच्या धाडीवर लालू यादव संतापले, म्हणाले, “नतमस्तक…”
जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष
चीनच्या संसदेने शुक्रवारी अध्यक्ष शी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची मुदतवाढ देण्यावर शिक्कामोर्तब केले. चीनमध्ये सुरू असलेल्या कायदे मंडळाच्या अधिवेशनात एकमताने हा निर्णय घेण्यात आला. चीनच्या अध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाळ मिळणे ही दुर्मिळ घटना आहे. अशी संधी जिनपिंग यांना मिळाली आहे. यावरून जिनपिंग यांची वाढलेली राजकीय ताकद दिसते, दुसऱ्या बाजूला याकडे पाहताना पाश्चिमात्य माध्यमं दावा करत आहेत की, चीनची माओ काळातील एकचालकानुवर्ती पद्धतीकडे वाटचाल सुरू आहे.