तैवान प्रकरणावरून चीनने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत तैवान मुख्य भूप्रदेश चीनशी जोडला जाईल, असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी म्हटलंय. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बोलत होते. एनबीसी या अमेरिकन वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं.
सॅन फ्रान्सिस्कोच्या शिखर परिषदेत अमेरिका आणि चीनचे अनेक अधिकारी उपस्थित होते. या परिषदेत एका गटाच्या बैठकीत शी यांनी बायडेनला इशारा दिला. “तैवानला चीनमध्ये शांततेत समावेश करून घ्यायचं आहे. आम्हाला कोणतीही बळजबरी करायची नाही”, असं चीनने म्हटलं आहे. या शिखर परिषदेत हे दोन जागतिक नेते एकत्र येणार असल्याचं समजल्यावर जागतिक चर्चा सुरू झाली होती. जो बायडेन यांच्या कार्यकाळातील ही त्यांची दुसरी भेट होती. इस्रायल-हमास युद्ध आणि तैवान हे दोन विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. अमेरिकेने तैवानला नुकतीच लष्करी मदत देऊ केली आहे. यामुळे धोरण बदलत असल्याचे द्योतक मानले जात आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध ताणले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांतील बिघडलेले संबंध काहीसे सावरता येतात का, याचाही जिनपिंग यांचा प्रयत्न सुरू असल्याचं म्हटलं जातंय.
चीन २०२५ किंवा २०२७ पर्यंत तैवानवर कब्जा मिळवेल असं अमेरिकेने भाकित केलं होतं. त्यावरूनही चीनने अमेरिकेला सुनावलं आहे. अमेरिकेने जाहीर केलेली ही तारीख चुकीची असून तैवानवर कब्जा मिळवण्याबाबत अद्याप वेळ निश्चित झाली नसल्याचं जिनपिंग यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली.
तैवानशी शांततापूर्ण एकीकरणाच्या चीनच्या उद्दीष्टांना अमेरिकेचे समर्थन आहे, असं काही चिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. परंतु, हे वृत्त व्हाईट हाऊसने नाकारलं आहे. तर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनीही यावर भाष्य करण्यास नकार दिला.
गेल्या काही दिवसांत चीनचे तैवानबाबतचे वर्तन अधिक आक्रमक होत जातंय. त्यामुळे जिनपिंग यांच्या या इशाऱ्याचा अमेरिका गांभीर्याने विचार करत आहे. तसंच, चीनने अमेरिकेला इशारा दिल्याचं समोर येताच RS.C.सेन लिंडसे ग्रॅहम यांनी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सना चीनला रोखण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन करणारे निवेदन जारी केले.
चीन-अमेरिकेचे संबंध कसे आहेत?
गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापार-युद्ध सुरू आहे. एकमेकांच्या देशातून आयातबंदी किंवा आयात मालावर अतिरिक्त शुल्क लावणे, विकसनशील देशांमध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये स्पर्धा असे साधारणत: या व्यापार-युद्धाचे स्वरूप आहे. मात्र गेल्या वर्षी दोन्ही देशांचे संबंध अधिक चिघळले ते अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टी भागात चिनी बनावटीचे फुगे आकाशात दिसल्यानंतर. हे फुगे हेरगिरीसाठी वापरण्यात येत असल्याचा आरोप अमेरिकेने केला, तर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सोडलेले फुगे ‘भरकटल्या’चा दावा चीनने केला. अमेरिकेने थेट हवाई दलाच्या मदतीने हा फुगा फोडला. दोघांमधील वितुष्टाचे दुसरे कारण म्हणजे अमेरिकेच्या तत्कालिन सभापती नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली. त्यानंतर चीनने सैन्यदलांच्या पातळीवर होणारा संवाद थांबविला.