भारताच्या पूर्व किनारपट्टीवर उत्तर ओडिशामध्ये असणाऱ्या धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनिशी हे चक्रीवादळ धडकलं. त्यामुळे किनारी भागात असणाऱ्या घरांचं आणि नागरी सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर लँडफॉल झाल्यानंतर यास चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत समुद्रात असणारं हे चक्रीवादळ आता पूर्णपणे जमिनीवर आलं आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

“यास चक्रीवादळानं त्याची लँडफॉलची प्रक्रिया दुपारी अडीचच्या सुमारास पूर्ण केली आहे. मात्र, या भागामध्ये उद्या दुपारपर्यंत पाऊस राहणार आहे. उद्या म्हणजेच २७ मे रोजी सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये. कारण समुद्र या काळात खवळलेला असेल”, अशी माहिती भुवनेश्वर वेधशाळेतील ज्येष्ठ वैज्ञानिक उमाशंकर दास यांनी दिली आहे.

या महिन्यात २१ मे पासूनच बंगालच्या उपसागरात अंदमान-निकोबार बेटांच्या उत्तरेकडे चक्रीवादळासाठी अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं होतं. २४ मे रोजी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढला. मंगळवारी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचं चक्रीवादळात रुपांतर झालं. बुधवारी म्हणजे २६ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यावरील धामरा आणि बालासोर यांच्यामध्ये या चक्रीवादळाचा लँडफॉल झाला. यावेळी किनारी भागात तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहात होते. ओडिशासोबतच पश्चिम बंगालच्या किनारी भागातल्या इस्ट मिदनापूर आणि साऊथ २४ परगणा या भागांना देखील वादळाचा तडाखा बसला. मात्र, तोपर्यंत चक्रीवादळाचा वेग ताशी ९० किलोमीटर इतका कमी झाला होता.

 

झारखंडमध्ये हाय अलर्ट!

दरम्यान, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारी भागात थैमान घातल्यानंतर आता चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं मोर्चा वळवला आहे. या तिन्ही राज्यांनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिवसभरात सुमारे १२ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. मात्र, आता झारखंडला हाय अलर्ट देण्यात आला आहे.

 

बुधवारी मध्यरात्री चक्रीवादळ झारखंडमध्ये

ओडिशा आणि पश्चिम बंगालमधून यास चक्रीवादळाला झारखंडमध्ये प्रवेश करण्यासाठी बुधवार मध्यरात्रीपर्यंतचा वेळ लागेल. या पार्श्वभूमीवर झारखंडमध्ये सखल भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. संध्याकाळपर्यंत वाऱ्याचा वेग काही प्रमाणात कमी झालेला असेल, अशी माहिती वेधशाळेकडून देण्यात आली आहे. लँडफॉल झाल्यानंतर वादळानं उत्तर आणि उत्तर-पश्चिम असा प्रवास सुरू केला आहे.

 

वाचा सविस्तर : यास चक्रीवादळाचं रौद्ररुप; ओडिशामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस

 

“बुधवारी दुपारपर्यंत शेपटाकडच्या भागासकट वादळ समुद्रातून पूर्णपणे ओडिशाच्या जमिनीवर आलं आहे. पुढे झारखंडकडे जाताना त्याचं रुपांतर अतीतीव्र चक्रीवादळातून आधी तीव्र चक्रीवाधळ आणि त्यानंतर पुढच्या ६ तासांमध्ये म्हणजेच मध्यरात्र उलटेपर्यंत फक्त चक्रीवादळ असं होईल. यावेळी त्याचा वेग साधारणपणे ताशी ६० ते ७० किलोमीटर इतका असेल”, अशी माहिती ओडिशाचे स्पेशल रिलीफ कमिशनर पी. के जेना यांनी दिली आहे.

Story img Loader