याकूब मेमन याने मुंबई बॉम्बस्फोटात सामील असलेल्यांना आरडीएक्स उपलब्ध करून दिले होते शिवाय विमानाची तिकिटेही दिली होती. मेमन बंधू १० मार्च १९९३ रोजी म्हणजे मुंबई बॉम्बस्फोटाच्या दोन दिवस अगोदर मुंबईतून पळाले होते. या प्रकरणाचा तपास मुंबईचे आताचे सह पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. दक्षिण मध्य मुंबईत एका स्थानिक बीटवरच्या पोलिसाला वरळीत एक बेवारस मारुती ८०० ही गाडी दिसली. तिची नोंदणी कागदपत्रे रुबिना मेमनच्या नावाने होती. त्यावरून पोलिसांनी मेमन बंधूंच्या माहीम येथील अल हुसैनी इमारतीचा माग काढला. तेथे तपास करताना मारिया यांना फ्रीजवर एका दुचाकीच्या किल्ल्या सापडल्या व नंतर कठा बाजार भागात स्फोटकांनी भरलेले एक वाहन तपासात सापडले. या प्रकरणी निकालानंतर याकूबची पत्नी रहीन हिने दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले होते की, आम्ही कराचीत नजरकैदेत होतो, तेथे आम्हाला राहणे आवडत नव्हते म्हणून आम्ही भारतात आलो. तिच्या मते याकूब मेमन १९ जुलै १९९४ मध्ये स्वत:हून भारतात आला, पण त्याला अटक केल्याचे दाखवण्यात आले. काहींच्या मते याकूब मेमन व गुप्तचर संस्था यांच्यातील समझोत्यानुसार याकूबला १९९४ मध्ये दुबईमार्गे पाकिस्तानातून भारतात आणले. याकूबला टाडा न्यायालयाने २००७ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली ती नंतर २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. याकूबने बॉम्बस्फोटासाठी टायगर मेमनच्या मालकीच्या आस्थापनेमार्फत पैसा पुरवला. याकूबला कसे पकडण्यात आले याबाबत एकवाक्यता नाही. पण त्याने केलेल्या दाव्यानुसार त्याला नेपाळमध्ये पकडून भारतात आणण्यात आले. काठमांडू विमानतळावर जुलै १९९४ मध्ये त्याला अनेक व्हिसा कागदपत्रांसह पकडण्यात आले. सीबीआयच्या मते त्याला नवी दिल्लीत अटक करण्यात आली. त्याला फाशीची शिक्षा झाली असून तो आता नागपूर तुरुंगात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा