मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन अखेर फासावर लटकणार हे निश्चित झाले आहे. बुधवारी रात्री राष्ट्रपतींनी याकूबचा दया अर्ज फेटाळल्यानंतर अभूतपूर्व अशा घडामोडी पहायला मिळाल्या. याकूबच्या वकिलांकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पहाटे दोन वाजता सुनावणीला सुरूवात झाली. फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाल्यापासून या शिक्षेच्या अंमलबजावणीच्या दिवसापर्यंत १४ दिवसांचे अंतर असावे, या मागणीसाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. याकूबला फाशी देण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच करण्यात आलेल्या या नव्या याचिकेमुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, रात्रभर चाललेल्या सुनावणीनंतर गुरूवारी पहाटे न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने याकूबला फाशी देण्याचा निर्णय देण्याचा योग्य असल्याचा निकाल दिला. यावेळी बचावपक्षातर्फे करण्यात आलेले सर्व दावे न्यायालयाने फेटाळून लावले. याकूबला त्याची बाजू मांडण्याची पुरेशी संधी मिळाली होती. त्यामुळे आता या खटल्यात अधिक वेळ घालवणे योग्य नाही. याशिवाय, न्यायप्रक्रियेनुसार याकूबला त्याच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी देण्यात आल्याचे न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा