मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर त्याला केवळ तो मुस्लीम असल्याने फाशी दिले जात असल्याचे एआयएमआयएमचे प्रमुख असाउद्दीन ओवैसी यांनी सांगितले. त्याला प्रत्युत्तर म्हणून, ज्यांना न्यायव्यवस्थेबाबत आदर नाही त्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असा इशारा दिला. भाजपनेही ओवैसी हे दहशतवादावर जातीय राजकारण करीत असल्याचा आरोप केला असून यापेक्षा घाणेरडे काहीही असू शकत नाही, असे म्हटले आहे.
याकूबच्या फाशीबाबत ओवैसी यांनी सांगितले की, मुंबई बॉम्बस्फोटातील फाशीची शिक्षा सुनावलेला एकमात्र आरोपी याकूब मेमन हा आहे, पण अयोध्येत बाबरी मशीद पाडणाऱ्यांना, मुंबईत जातीय दंगली करणाऱ्यांना, गुजरात दंगलीतील आरोपींना अशाच शिक्षा मिळायला पाहिजे होत्या; पण तसे झालेले नाही. बाबरी मशीद पाडणाऱ्यांना दोषी का ठरवले जात नाही, त्यांना फाशी का दिले जात नाही कारण मूळ पाप बाबरी मशीद पाडण्याचे होते. हैदराबाद येथील सभेत ते बोलत होते. श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल भाजप-सेना व काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही सरकारांनी दडपून टाकला. डिसेंबर १९९२ व जानेवारी १९९३ च्या दंगलीत किती जणांना दोषी ठरवले गेले? या दंगलींमध्ये एक हजार लोक मारले गेले होते. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित व स्वामी असीमानंद यांचा मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंध असताना त्यांना फाशीची शिक्षा मिळणार का , या सगळ्या बाबी एनआयए न्यायालयात काय सिद्ध करते यावर अवलंबून आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेक ऱ्यांना, बेअंत सिंग यांच्या मारेक ऱ्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा होता त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा दिली नाही, असे ते म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yakub memon being hanged because hes muslim says owaisi