मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर बुधवारी शिक्कामोर्तब झाले खरे, मात्र याकूबच्या शिक्षेला मुदतवाढ मिळावी यासाठी त्याच्या वकिलांसह अनेकांचे प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी याकूबचा दया अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून याकूबच्या शिक्षेला १४ दिवसांची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली. तर प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांच्यासह अनेक विधिज्ञांनी सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या घराकडे धाव घेत याकूबच्या शिक्षेला मुदतवाढ कशी देता येईल यासाठी कायद्याचा कीस पाडण्याचा प्रयत्न केला. या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर आज, गुरुवारी याकूबला फासावर लटकवले जाते किंवा कसे, हा प्रश्न रात्री उशिरापर्यंत अनुत्तरितच राहिला होता.
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर याकूब मेमन याने न्यायप्रक्रियेतील त्रुटी दर्शवत तसेच राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर करत कालहरण करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यातच मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय पीठात याकूबच्या शिक्षेवरून मतभेद निर्माण झाले होते. या पाश्र्वभूमीवर याकूबची याचिका मोठय़ा पीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा, प्रफुल पंत आणि अमिताव राव यांच्या त्रिसदस्यीय पीठाने मेमनची याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, फाशी टाळावी यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणाऱ्या याकूबला अपयशच आले. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी रात्री उशिरा याकूबचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी याकूबचा अर्ज केंद्रीय गृह मंत्रालयाकडे विचारासाठी पाठवला होता. मात्र, गृह मंत्रालयानेही याकूबचा अर्ज तातडीने फेटाळून लावला.
याकूबने शिक्षेबाबत घेतलेल्या हरकती
* न्यायालयाने न्याय देताना सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी विचारात घेतल्या नव्हत्या.
* राष्ट्रपतींनी ११ एप्रिल २०१४ रोजी दयेचा अर्ज फेटाळून लावला, त्याची माहिती २६ मे रोजी देण्यात आली.
* आपले म्हणणे ऐकून न घेताच परस्पर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
* आरोपीला दोन आठवडे आधी शिक्षेची माहिती देण्यात येते, मात्र हा नियमही पाळण्यात आला नाही
फाशीची शिक्षा होणारा एकमेव आरोपी
मुंबई बाँबस्फोट खटल्यातील १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना जुलै २००७ मध्ये विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावल्या. त्यात प्रमुख आरोपी याकूब मेमनसह आरडीएक्स स्फोटके विविध ठिकाणी ठेवणाऱ्यांसह १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
वकिलांची अखेरची धडपड
बुधवारी रात्री उशिरा याकूबच्या वकिलांनी त्याच्या फाशीला आणखी १४ दिवस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली. याकूब मानसिकदृष्टय़ा आजारी असल्याचे कारण पुढे करत त्याची फाशी दोन आठवडे लांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याकूबच्या फाशीवरून पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
टाडा न्यायालयाने ३० एप्रिल रोजी याकूबला सुनावलेल्या मृत्युदंडाच्या आदेशात कोणतीही कायदेशीर त्रुटी आढळलेली नाही. या पाश्र्वभूमीवर याकूबने सादर केलेली रिट याचिका रद्दबातल ठरते. तसेच त्याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा निर्णयही योग्य होता. -सर्वोच्च न्यायालय