मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकुब अब्दुस रझाक मेमन याने फाशीच्या शिक्षेवर दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. ३० जुलैच्या फाशीस स्थगिती द्यावी अशी मागणी त्याने याचिकेत केली आहे.
सरन्यायाधीश एच.एल.दत्तू यांनी सांगितले की, याकूब मेमनच्या अर्जाची फाईल आपल्याकडे आली होती, त्याच्या सुनावणीसाठी न्यायपीठ ठरवून दिले असून त्याची सुनावणी सोमवारी केली जाईल. हे अतिशेय संवेदनशील प्रकरण असून दत्तू, अरूण मिश्रा व अमिताव रॉय या न्यायाधीशांनी म्हटले आहे की, २७ जुलै रोजी ए.आर.दवे यांच्या नेतृत्वाखालील पीठापुढे या अर्जाची सुनावणी होईल. डेथ पेनल्टी लिटीगेशन क्लिनिक या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली या संस्थेच्या केंद्राची बाजू वरिष्ठ वकील टी.आर अध्यार्जुना मांडणार आहेत. राजू रामचंद्रन यांनी सांगितले की, मेमन याचे जीवन टांगणीला लागले असताना वेळ वाया घालवला जात आहे.
अध्यार्जुना यांनी सांगितले की, याकूबला गुरूवारी सकाळी सात वाजता फाशी दिली जाणार आहे, त्याच्या याचिकेबरोबरच आमची याचिकाही सुनावणीस घ्यावी. फाशी देण्यात घाई केली जात असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा असे याकूब मेमनचे म्हणणे आहे.

Story img Loader