मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकुब मेमन याने राष्ट्रपतींकडे केलेला दयेचा अर्ज बुधवारी संध्याकाळी फेटाळण्यात आला. यामुळे याकुबला गुरुवारी सकाळी फासावर लटकवले जाणार हे निश्चित झाले आहे. याकुबने बुधवारीच राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.
फाशीची शिक्षा टाळण्यासाठी याकुब मेमनकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेले सर्व प्रयत्न बुधवारी अपयशी ठरले. याकुब मेमनने निर्णय सुधार याचिकेसंदर्भात आणि डेथ वॉरंटविरोधात केलेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने फेटाळल्या. याकुबने राज्यपालांकडे केलेला दयेचा अर्जही फेटाळण्यात आला असून, त्याला गुरुवारी सकाळी सात वाजता नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात फाशी दिली जाणार आहे. फाशी देण्यासाठीची सर्व प्रक्रिया नागपूर कारागृहात पूर्ण करण्यात आली आहे. कारागृहाबाहेर प्रचंड पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
याकुबच्या दयेच्या अर्जावर राष्ट्रपतींनी केंद्रीय गृह खात्याचा अभिप्राय मागविला होता. त्यावर हा अर्ज फेटाळण्याची शिफारस केंद्रीय गृह खात्याकडून करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला.

Story img Loader