मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकाप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला एकमेव आरोपी याकूब अब्दुल रझाक मेमन याने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत केलेल्या अर्जावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने भिन्न निर्णय दिले. त्यामुळे आता याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सदर याचिका सरन्यायाधीशांकडे वर्ग करण्यात आली आहे.
याकूब मेमन याला येत्या ३० जुलै रोजी फाशी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी त्याने याचिका केली होती. न्या. ए. आर. दवे यांनी याकूबची याचिका फेटाळली, तर न्या. कुरियन जोसेफ यांनी त्याच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली.
याकूबच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत दोन न्यायाधीशांनी भिन्न निर्णय दिले आहेत. त्यामुळे एका न्यायाधीशाने स्थगिती दिली आणि दुसऱ्याने दिली नाही तर कायद्यानुसार त्या आदेशात सुसूत्रताच राहात नाही.
फाशीच्या शिक्षेबाबतच्या निर्णयात मतभिन्नता असल्याने पीठाने ही याचिका तातडीने सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडे वर्ग केली. सदर याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी योग्य पीठाची स्थापना करावी आणि बुधवारीच त्यावर सुनावणी घ्यावी, अशी विनंतीही पीठाने सरन्यायाधीशांना केली आहे.
याकूबची याचिका फेटाळताना न्या. दवे यांनी म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी याकूबची दयेची याचिका निकाली काढावी. आपल्या दुरुस्ती याचिकेवर २१ जुलै रोजी निर्णय घेताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही, हा याकूबने याचिकेत केलेला दावा न्या. दवे यांनी फेटाळला. फाशीच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, या न्या. कुरियन जोसेफ यांच्या मताशी न्या. दवे यांनी असहमती दर्शविली. फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आपण सहभागी होऊ इच्छित नाही, त्यामुळे सरन्यायाधीशांनी याबाबत निर्णय घ्यावा, असे न्या. दवे म्हणाले आणि त्यांनी या संदर्भात मनुस्मृतीमधील उदाहरण दिले.
मेमन याने दाखल केलेल्या दुरुस्ती याचिकेवर निर्णय घेताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नाही, त्यामुळे न्या. दवे यांच्या मताशी सहमती दर्शविणे शक्य नाही, असे न्या. जोसेफ म्हणाले. योग्य पद्धतीचा अवलंब केलेला नाही हे सिद्ध झाले तर प्रथम या त्रुटी दूर करणे गरजेचे आहे, असे मतही न्या. जोसेफ यांनी व्यक्त केले.

Story img Loader