उत्तरकाशी जिल्ह्यातील स्यानाचट्टी आणि रणचट्टी दरम्यानचा रस्ता खचल्याने यमुनोत्री महामार्ग शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे यमुनोत्री परिसरात हजारो प्रवासी अडकले. दामटा ते जानकीचट्टी दरम्यानही सर्व प्रवासी यमुनोत्री महामार्ग कधी उघडण्याची वाट पाहत आहेत. राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता राजेश पंत म्हणाले, रस्ता लवकरच खुला केला जाईल.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, यमुनोत्री मंदिराकडे जाणाऱ्या महामार्गाची सुरक्षा भिंत कोसळल्याने सुमारे १०,००० लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असून, महामार्गालगत विविध ठिकाणी १० हजार लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्ता पुन्हा खुला होण्यासाठी ३ दिवस लागू शकतात. जिल्हा प्रशासन काही छोट्या वाहनांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मोठ्या वाहनांमध्ये दूरवरून आलेल्या लोकांना बाहेर पडता आलेले नाही.
हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये अनेक प्रवासी अडकले
चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची ऑफलाइन नोंदणी बंद करण्यात आली आहे. नोंदणीशिवाय यात्रेकरूंना ऋषिकेशच्या वर जाऊ दिले जात नाही. अशा स्थितीत ऋषिकेश, हरिद्वारसह परिसरात साडेनऊ हजार यात्रेकरू अडकून पडले आहेत. सर्वांनी हॉटेल, धर्मशाळा, लॉजमध्ये आश्रय घेतला आहे, त्यामुळे ऋषिकेश आणि हरिद्वार पूर्णपणे खचाखच भरले आहेत.
आता ऑफलाइन नोंदणीची कडक प्रणाली
पर्यटन विभागाने ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था अधिक कडक केली आहे. आता ऑफलाइन नोंदणी आठवडाभरासाठीच होईल, असे पर्यटन सचिवांनी सांगितले. एका आठवड्यापेक्षा जास्त काळाची नोंदणी करण्यात येणार नाही.