इंडियन मुजाहिदीनचा संस्थापक यासिन भटकळला अटक झाल्यानंतर आता भारताच्या आशा उंचावल्या असून अनेक गुन्हय़ांसाठी येथील तपासयंत्रणांना हव्या असलेल्या इतर दहशतवाद्यांना पाकिस्तान भारताच्या हवाली करेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
भारतात गुन्हे करून जगात अन्यत्र कुठेही जाऊन लपून बसण्याचे दहशतवाद्यांचे दिवस आता संपत चालले आहेत. याचे कारण म्हणजे त्या त्या देशांतील जनतेची विचार करण्याची पद्धत बदलली आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार आले. आता त्यांची ही नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी जनतेच्या इच्छा-आकांक्षेची पूर्तता करावी, असे खुर्शिद म्हणाले. केवळ पाकिस्तानच नव्हे तर ज्या ज्या देशांनी दहशतवादी व त्यांच्या संघटनांना आपल्या पंखाखाली घेतले आहे त्यांनी आता पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. भारताच्या या भूमिकेला आता फळे येऊ लागल्याचेही खुर्शिद म्हणाले.