बाबरी पतन आणि गुजरात दंगल या घटनांनंतर मोठय़ा प्रमाणात अल्पसंख्याक समाजाचे स्थलांतरण झाले. या स्थलांतरणातून निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळेच बहुसंख्याकांना लक्ष्य करण्यासाठी २००३ मध्ये इंडियन मुजाहिदीनची स्थापना करण्यात आली व त्यात यासिनची भूमिका महत्त्वाची होती. देशातील बहुतांश महत्त्वाच्या दहशतवादी हल्ल्यांमागे यासिनचाच हात असल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) आरोप आहे. गेल्याच महिन्यात यासिनवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटकेचे आदेशही देण्यात आले आहेत.
इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक होण्यापूर्वी यासिन स्टुडंट्स ऑफ इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता होता. मात्र, या संघटनेवर बंदी आल्यानंतर यासिनने भटकळ या त्याच्या मूळ गावीच रियाझ व इक्बाल यांच्या साथीने इंडियन मुजाहिदीनची स्थापना केली. बाबरी व गुजरातकांडामुळे अस्वस्थ झालेल्या मुस्लीम तरुणांना जिहादसाठी भडकवायचे व त्यांना दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचे काम यासिन करायचा… त्याला या कामात पाकिस्तानातून आर्थिक मदत मिळायची. १९ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत झालेल्या बाटला हाऊस गोळीबार प्रकरणानंतर इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांची ओळख उघड होऊ लागली. त्यात यासिनच्या नावाचा समावेश होता. तेव्हापासून यासिन सुरक्षित ठिकाणाच्या शोधात होता. बाटला हाऊस प्रकरणानंतरही त्याने देशभर दहशतवादी हल्ले घडवण्याचे कट आखण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर तो परागंदा झाला. तेव्हापासून तपासयंत्रणा त्याच्या मागावर होती, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. एनआयएच्या येथील न्यायालयाने यासिनविरोधात अजामीनपात्र अटकेचे आदेश जारी केले आहेत.
अनेक हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार
बाबरी पतन आणि गुजरात दंगल या घटनांनंतर मोठय़ा प्रमाणात अल्पसंख्याक समाजाचे स्थलांतरण झाले.
First published on: 30-08-2013 at 05:10 IST
TOPICSयासिन भटकळ
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yasin bhatkal mastermind of many bomb plant says nia