इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासिन भटकळ याचे कर्नाटकमध्ये असलेले अत्तराचे दुकान हा २००१ मध्ये देशात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याची योजना आखण्यासाठीचा अड्डा बनला होता, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) म्हटले आहे.
उडुपी जिल्ह्य़ातील भटकळ येथे असलेले अत्तर आणि निसर्गोपचारांचे दुकान हा २००१ मध्ये यासिन आणि फसीह मेहमूद या मुजाहिद्दीनच्या महत्त्वाच्या सदस्यांचा अड्डा बनले. यासिनने डिसेंबर २००१ मध्ये ‘अलमोहताशाम’ नावाचे दुकान नूर मशिदीजवळच थाटले होते, असेही एनआयएने म्हटले आहे.
अंजुम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये हे दुकान लोकप्रिय होते. फसीह मेहमूद आणि तारिक अंजुम हे विद्यार्थी तेथे वारंवार भेट देत होते आणि त्या वेळी दरभंगा येथील विद्यार्थी स्थानिक, राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नांसमवेतच जिहादवरही चर्चा करीत होते. या प्रकारामुळेच अत्तराचे सदर दुकान हे दरभंगाप्रमाणेच अड्डा बनले, असे यंत्रणेने आपल्या २७७ पानांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.
फसीह हा बिहारमधील दरभंगाचा रहिवासी होता तर अंजूम हा नालंदाचा रहिवासी होता. यासिन आणि अन्य दहशतवाद्यांनी दरभंगामध्ये लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणही शोधले होते, असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader