उत्तर प्रदेशाच्या गाजियाबाद येथील दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी शुक्रवारी मुस्लीम समाज तसेच प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचे पडसाद देशभरात उमटले होते. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या. दरम्यान, आता गाजियाबाद पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत यती नरसिंह आनंद सरस्वती यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी कारवाई

‘द इंडियन एक्सप्रेस’ने पोलिसांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या वृत्तानुसार, पोलिसांनी यती नरसिंह आनंद सरस्वती तसेच त्यांच्या एका सहकाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. मात्र, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. दरम्यान, शुक्रवारी मुस्लीम समाज तसेच प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्यानंतर यती नरसिंह आनंद सरस्वती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांनी आता गाजियाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्याकडून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न; आधी आंघोळीचा व्हिडीओ बनवला नंतर…

अमरावतीतही उमटले होते पडसाद

यती नरसिंह आनंद सरस्वतींच्या विधानानंतर देशभरात हिंसक घटना घडल्या होत्या. अमरावतीतही त्याचे पडसाद उमटले होते. त्यांच्या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी करत शुक्रवारी जमाव अमरावतीतल्या नागपुरी गेट पोलीस ठाण्‍यात दाखल झाला होता. यावेळी पोलिसांसोबत चर्चा करीत असतानाच जमावातील काही लोकांनी अचानक बाहेर येऊन दगडफेक सुरू केली होती. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्‍या नळकांड्या फोडाव्या लागल्या होत्या.

हेही वाचा – Kanpur Age scam: ‘६० वर्षांच्या वृद्धाला २५ वर्षांचा तरुण बनवू’, कानपूरच्या दाम्पत्यानं इस्रायलच्या मशीनचा हवाला देऊन ३५ कोटी लुबाडले

यापूर्वी केलं होतं आक्षेपार्ह विधान

महत्त्वाचे म्हणजे यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी आक्षेपार्ह विधान करण्याची आणि कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०२१ मध्ये हरिद्वारे येथे झालेल्या धर्मसंसदेत त्यांनी अशाचप्रकारे मुस्लीम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये पुन्हा आक्षेपार्ह विधान केलं होतं. अशातच आता शुक्रवारी केलेल्या विधानानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९, कलम ३०२, आणि कलम १९७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.