Year Ender 2023 : वर्ष २०२३ मध्ये मेटा कंपनीच्या व्हॉट्सॲपने अनेक नवे फिचर्स आणले आणि काही फिचर्सचा वापर करून स्कॅमर्सनी सामान्यांची मोठी फसवणूक केली. यातील बरेचसे स्कॅम हे वैयक्तिक माहिती चोरणारे होते तर काही स्कॅम्सनी पीडित व्यक्तींचे बँक खाते रिकामे केले. यापैकी पाच मोठ्या स्कॅम पद्धतीची माहिती आपण घेणार आहोत. जेणेकरून येत्या २०२४ मध्ये तुम्ही या पद्धतीपासून स्वतःचा आणि मित्रपरिवाराचा बचाव करू शकाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंग स्कॅम

२०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलिंग स्कॅम झाल्याचे प्रकार पाहायला मिळाले. सोशल मीडियावरून सामान्य युजर्सची घोटाळेबाज पहिल्यांदा मैत्री करत असत. त्यानंतर ते युजर्सशी व्हिडिओ चॅट करायचे. हे चॅट रेकॉर्ड केले जायचे. त्यानंतर याच रेकॉर्डिंगचा वापर करून युजर्सला धमकावले (ब्लॅकमेल) जात असे. पीडित व्यक्तीचे फोटो किंवा व्हिडिओ जाहीर करण्याची धमकी दिली जायची. त्याच्याबदल्यात पैसे उकळले जायचे. यासारख्या स्कॅमपासून लांब राहायचे असेल तर अनोळखी नंबरवरून आलेले व्हॉट्सॲप कॉल अजिबात उचलू नका. असा कॉल आल्यानंतर लागलीच तो नंबर ब्लॉक करून टाका, म्हणजे त्याच नंबरवरून पुन्हा कॉल येणार नाही.

मित्र संकटात सापडल्याचा बनाव

यावर्षी आणखी एक घोटाळा प्रचलित झाला होता, तो म्हणजे मित्र संकटात सापडला आहे. हॅकर्स तोतयागिरी करून आपले मित्र किंवा दूरचे नातेवाईक असल्याचा बनाव करून आपल्याशी संपर्क साधतात. या घोटाळयात हॅकर्सकडून काही लिंक पाठवल्या जातात ज्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या संपर्क यादीतील नंबर हॅकर्सला मिळतात. तसेच मित्र संकटात असल्याचा बनाव करून पैशांची मागणी केली जाते. त्यामुळे अशावेळी आपल्या मित्राला फोन करून बोलून घ्यावे. खरंच तो अडचणीत आहे की, त्याच्या नावाने स्कॅम केला जात आहे.

भेटवस्तू घोटाळा

स्कॅमर्स पीडितांशी मैत्रीचा बनाव करतात आणि त्यांना परदेशातून भेटवस्तू पाठविणार असल्याचे सांगतात. मात्र या भेटवस्तू सीमाशुल्क विभागाने ताब्यात घेतल्या असून त्या सोडविण्यासाठी पैसे पाठवा अशी मागणी करतात. महागड्या भेटवस्तू मिळतील या लालसेपोटी अनेक पीडित सीमाशुल्क विभागाचा अडथळा दूर करण्यासाठी पैसे पाठवितात. या प्रकारच्या घोटाळ्यात पीडितांना फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला जातो.

स्क्रीन मिररिंग स्कॅम

व्हॉट्सॲपच्या स्क्रीन मिररिंग या नव्या फिचरचा लाभ उचलून काही स्कॅमर्सनी पीडितांच्या मोबाईलवर आलेला वन-टाइम पासवर्ड (ओटीपी) चोरण्याचा प्रयत्न केला. पीडितांना स्क्रिन मिररिंग हा पर्याय चालू करण्यास सांगून स्कॅमर्स पीडितांच्या मोबाइलचा रिमोट ॲक्सेस मिळवितात. ज्यामुळे पीडितांच्या लॉगिन डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांच्या कामात अडथळा आणला जातो आणि ती माहिती चोरली जाते.

फिशिंग स्कॅम

यावर्षी व्हॉट्सॲपवर फिशिंग स्कॅम हा नव्या प्रकारचा स्कॅम सुरू झालेला पाहायला मिळाला. या प्रकारात पीडितांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अतिशय कमी दरात मिळत असल्याच्या लिंक्स पाठविल्या गेल्या. या लिंक्स फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन यासारख्या लोकप्रिय ई-कॉमर्स ब्रँडच्या नक्कल असतात. खासकरून सणासुदीच्या काळात अशा लिंक मोठ्या प्रमाणात पाठविल्या जातात. या लिंकवर केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागते. तुमच्या वैयक्तिक माहितीशिवाय बँक खाते आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डाचीही माहिती मागितली जाते. या माहितीचा वापर करून तुमच्या खात्यातील रक्कम चोरली जाते. बऱ्याच वेळा हॅकर्सकडून पीडित व्यक्तींचा डेटा दुसऱ्याला हॅकर्सना विकला जातो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Year ender these are the top five whatsapp scams indians fell for in 2023 kvg