कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पक्षातील आणि कर्नाटक सरकारमधील समर्थक यांच्याविरुद्ध पक्षादेश जारी करून मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी शनिवारी राज्याचे सहकारमंत्री बी.जे. पुट्टस्वामी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.
येडियुरप्पा हे रविवारी कर्नाटक जनता पक्षाची स्थापना करीत असून त्याच्या पूर्वसंध्येवर राज्य भाजपने येडियुरप्पांचे कट्टर समर्थक आणि तुमकूरचे खासदार जी. एस. बसवराज यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्याचप्रमाणे पुट्टस्वामी आणि बसवराज यांच्यावर कारणे दाखवा नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
पुट्टस्वामी यांनी येडियुरप्पांच्या नव्या पक्षाच्या बैठकीत सहभाग घेतला आणि त्या पक्षाचा प्रचारही केला, त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. पुट्टस्वामी यांना मंत्रिमंडळातून वगळावे, असे पत्रही राज्यपालांना देण्यात आले आहे.
प्रदेश भाजपचे अध्यक्ष ईश्वरप्पा यांनी बसवराज यांना पक्षातून काढून टाकण्याच्या निर्णयाची घोषणा केली. पक्षाच्या देशपातळीवरील नेत्यांशी सल्लामसलत करून बसवराज यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ईश्वरप्पा म्हणाले.
येडियुरप्पा यांनी आयोजित केलेल्या बैठकीला २३ आमदार आणि सात मंत्र्यांनी हजेरी लावली आणि त्यांच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर उपर्युक्त कारवाई करण्यात आली आहे. येडियुरप्पांना भाजपच्या ३० आमदारांचा आणि मंत्र्यांचा पाठिंबा आहे.