कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बंडखोर नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी पक्षाचा आणि आमदारकीचा त्याग करण्याची तयारी केली आहे.  आज, शुक्रवारी ते पक्षाशी गेल्या ४० वर्षांपासून असलेला घरोबा संपुष्टात आणणार आहेत.आपण आपल्या समर्थकांसह शुक्रवारी विधान भवनात जाऊन आमदारकीचा राजीनामा सादर करणार आहोत, असे येडियुरप्पा यांनी शिमोगा जिल्ह्य़ातील शिकरीपुरा या आपल्या मूळ गावी वार्ताहरांना सांगितले. भाजपच्या अनेक उच्चपदस्थ नेत्यांनी त्यांना पक्षात थोपवून ठेवण्याचे प्रयत्न त्यामुळे निष्फळ ठरले आहेत.
येडियुरप्पा यांच्या पक्षत्यागामुळे भाजप चांगलाच अडचणीत येणार असला तरी त्यांनी पक्ष सोडल्याने कोणताही परिणाम होणार नसल्याचे उसने अवसान पक्षाचे अनेक नेते आणत आहेत. कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेवर आणण्यात लिंगायत समाजाचे नेते असलेल्या येडियुरप्पा यांचा सिंहाचा वाटा आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रथमच भाजपचे सरकार येडियुरप्पांमुळेच सत्तारूढ झाले.   

Story img Loader