भाजपला सोडचिठ्ठी देऊन जवळपास वर्षभरापूर्वी स्वत:च्या पक्षाची स्थापना करणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा गुरुवारी कोणताही गाजावाजा न करता स्वगृही परतले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. येडियुरप्पा यांनी आपल्या समर्थकांसह पक्षाच्या मुख्यालयात प्रवेश करताच त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व देण्यात आले. भूतकाळाचे विसरून आणि  एकमेकांच्या मनात असलेले संशयाचे धुके दूर करून एकाच मातेच्या लेकरांप्रमाणे कामाला सुरुवात करू या, असे येडियुरप्पा म्हणाले.  काही चुकीच्या निर्णयांमुळे राज्यात काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला, आम्ही अक्षम्य अपराध केला आहे. सध्या काँग्रेस पक्षात नेत्यांची दिवाळखोरी आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान कधी होतात याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, असेहीयेडियुरप्पा म्हणाले.लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कर्नाटकमधील २८ जागांपैकी किमान २० जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे.

Story img Loader