मतदानाच्या दिवशीही कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपा नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर तोंडसुख घेतले. येडियुरप्पा यांच्या २२४ पैकी १५० जागा जिंकण्याच्या दाव्याबद्दल विचारले असता सिद्धरामय्या म्हणाले कि, येडियुरप्पा यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते मानसिक दृष्टया अस्थिर झाले आहेत. कर्नाटकात भाजपाला ६०-६५ पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असा दावा सिद्धरामय्या यांनी केला. काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावाही त्यांनी केला.

कर्नाटक विधानसभेच्या २२२ जागांसाठी मतदान सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाले आहे. भाजपाकडून येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा दिवसात राज्यात झंझावती प्रचार करत २० सभांना संबोधित केले. निवडणूक आयोगाने बंगळुरुच्या राजेश्वरी नगर आणि आणखी एका मतदारसंघातील मतदान पुढे ढकलले आहे.

राजेश्वरी नगरमध्ये १० हजार बोगस मतदार ओळखपत्रे सापडली होती तर एका मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या निधनामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. तीन दिवसांनी येत्या १५ मे रोजी मतमोजणी होईल. कर्नाटकातील निवडणूक आयोगाचे सदिच्छा दूत राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

सिद्धरामय्या कर्नाटकची परंपरा खंडित करणार का ?
सिद्धरामय्या यांच्यासमोर मागच्या ३३ वर्षांपासून सुरु असलेली एक परंपरा खंडित करण्याचे आव्हान आहे. कर्नाटकात १९८५ सालापासून कुठल्याही एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळवता आलेली नाही. रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखाली फक्त जनता दलाला कर्नाटकात सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आली होती. १९८५ सालापासून कर्नाटकात तेरा मुख्यमंत्री झाले आहेत. कर्नाटकातील जनतेने नेहमीच आलटून पालटून कौल दिला आहे. कर्नाटकातील हीच परंपरा बदलण्याचे सिद्धरामय्या यांच्यासमोर आव्हान आहे.

Story img Loader