कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वगृही परतण्याबाबत आपली भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे येडियुरप्पा यांनी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांनंतर प्रथमच जाहीर केले आहे.
तथापि, आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असेही कर्नाटक जनता पक्षाचे नेते येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग आणि अन्य नेत्यांकडून आपल्याशी याबाबत अनेकदा संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्याप आपण कोणत्याही निर्णयाप्रत आलेलो नाही. आपण आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असेही येडियुरप्पा म्हणाले.
येडियुरप्पा स्वगृही परतावेत यासाठी गेल्या काही आठवडय़ांपासून भाजप आणि कर्नाटक जनता पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवढणुकीत कर्नाटक जनता पक्षाला केवळ १० टक्केच मते मिळाली.
येडियुरप्पा यांनी स्वगृही परतण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी गळ भाजपच्या नेत्यांकडून घालण्यात येत आहे. मात्र पुढाकार कोणी घ्यावयाचा हा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. स्वगृही परतण्यास आवडेल का, असे विचारले असता येडियुरप्पा यांनी, अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे, सांगितले.
भाजपमध्ये परतण्याच्या प्रश्नावर आपले वैयक्तिक मत नाही, कारण आपण एका पक्षाचे नेतृत्व करीत आहोत. स्वगृही परतण्याबाबत भाजपकडून आपल्याकडे औपचारिकपणे अथवा अधिकृतपणे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असेही ते म्हणाले.
कर्नाटक जनता पक्ष अन्य पक्षांशी आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्हाला आमच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याची इच्छा आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या पक्षाला १० टक्रक्यांहून अधिक मते मिळाली आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा