कर्नाटक जनता पक्षाचे (केजीपी) अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अस्थिर करण्यासाठी १५ जानेवारीचा मुहूर्त निश्चित केला आहे. शेट्टर यांच्या सरकारचे भवितव्य शुक्रवारीच निश्चित होईल, अशी गर्जना येडियुरप्पा यांनी यापूर्वी केली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये याबाबतचा कोणताही निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे आता १५ जानेवारीला सरकारचे भवितव्य ठरविण्यात येईल, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक जनता पक्षाच्या या बैठकीला भाजपचे १४ ते १५ आमदार उपस्थित होते. मात्र आपल्या पक्षाला भाजपचे ४० ते ५० आमदार योग्य वेळी आपल्याला पाठिंबा देतील, असा दावा त्यांनी या वेळी केला. शेट्टर सरकारला फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प सादर करता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपला पक्ष हा केवळ भाजपच्या बंडखोर आमदारांचा असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी फेटाळला. विविध पक्षाचे नेते आपल्या पक्षात येण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील वेगवेगळ्या भागातील ५० विधानसभा मतदारसंघांचा दौरा १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी येडियुराप्पा यांचा दावा निराधार असल्याचे सांगत आपले सरकार नियोजित वेळेवर अर्थसंकल्प सादर करील, असे स्पष्ट केले. केजीपीचे डावपेच उधळून लावण्यासाठी भाजपने शनिवारी पक्षाच्या शीर्ष समितीची बैठक बोलाविली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस धर्मेद्र प्रधान व अनंतकुमार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा