आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात दहा वर्षांमध्ये केलेली कामं, पेटलेलं मणिपूर यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या काळात देश भ्रष्टाचाराच्या राक्षसाच्या विळख्यात अडकला होता हेदेखील म्हटलं आणि मी पुढच्या वर्षी ध्वजारोहणासाठी पुन्हा येईन असंही वक्तव्य केलं. त्यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी नक्की ध्वजारोहण करतील पण तो कार्यक्रम त्यांच्या घरी होईल. जे सत्तेवर असतात त्यांना हे वाटतच असतं की आपण पुन्हा निवडून येऊ. पण तुम्ही जिंकणार की हरणार हे सर्वस्वी मतदारांच्या हाती असतं. मतदार तुम्हाला काय कौल देतात? त्यावर सगळं अवलंबून आहे. २०२३ च्या १५ ऑगस्टच्या दिवशी हे सांगायचं की पुन्हा येईन यात नरेंद्र मोदींचा अहंकार दिसून येतो. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही त्यांनी विरोधकांवर टीका केली. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी देश कसा एकसंध ठेवणार? असाही प्रश्न खरगे यांनी विचारला आहे.
के.सी. वेणुगोपाल यांनी काय म्हटलं आहे?
दुसरीकडे काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनीही असंच एक वक्तव्य केलं आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांना अद्याप वेळ आहे. त्या निवडणुकीत कुणाला कौल द्यायचा? हे लोक ठरवतील. त्यानंतरच कोण पुन्हा येईल की नाही हे ठरेल. माझं पंतप्रधान मोदींना सांगणं आहे किमान २०२४ च्या निवडणुकीची आणि त्यानंतरच्या निकालांची तरी वाट बघा. दरम्यान आज झालेल्या स्वातंत्र्य दिवसाच्या ध्वजारोहण सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी ाणि सोनिया गांधी यांची अनुपस्थिती होती. त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या.
भाषणात नेमकं काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“२०१४ मध्ये मी तुम्हाला परिवर्तन घडेल असं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मला या सर्वोच्च पदावर बसवलं. २०१९ मध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि आशीर्वाद दिला. आता २०२४ साठीही मला आशीर्वाद द्या. पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. मी तुमच्यासाठीच जिंकतो आहे, जिंकेन. मी जे कष्ट उपसतो आहे ते तुमच्यासाठीच आहेत. कारण सगळे भारतीय हे माझं कुटुंब आहेत. मी तुमचं दुःख सहन करु शकत नाही.” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढच्या टर्ममध्येही आपणच पंतप्रधान असू हा विश्वास व्यक्त केला. मोदींच्या याच वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे.