वृत्तसंस्था, मॉस्को

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रशियातील ‘वॅग्नेर’ या खासगी सैन्यदलाचे संस्थापक प्रमुख येव्हजेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे रशियाने रविवारी अधिकृतरीत्या जाहीर केले. वैद्यकीय तपासणीअंती विमानाच्या अवशेषांमध्ये आढळलेल्या मृतदेहांपैकी एक प्रिगोझिन यांचा असल्याला रशियातील तपास पथकाने दुजोरा दिला. जून महिन्यात बंडाचा अयशस्वी प्रयत्न केलेल्या प्रिगोझिन यांचा अंत झाल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

तपास समितीच्या प्रवक्त्या स्वेतलाना पेट्रेन्को यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे की, बुधवारी झालेल्या विमान अपघातातील सर्व दहा मृतदेहांची ओळख पटली आहे. न्यायवैद्यक आणि जनुकीय चाचण्यांतून ही ओळख पटविण्यात आली आहे; पण हा विमान अपघात कसा घडला असावा याबाबत त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही. विमानातून प्रवास करणाऱ्यांच्या यादीत ६२ वर्षीय प्रिगोझिन यांचे नाव असल्याचे रशियाच्या नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाने अपघातानंतर सांगितले होते. मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गकडे जात असताना विमान कोसळले होते. दोन महिन्यांपूर्वीच प्रिगोझिन यांनी रशियाच्या लष्कराविरुद्ध बंड पुकारले होते. सैनिकांनी युक्रेनच्या प्रदेशातून मॉस्कोच्या दिशेने कूच केली होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या बंडाची संभावना ‘देशद्रोह’ अशी केली होती. बंडखोरांना कठोर शिक्षेचे सूतोवाच पुतिन यांनी केले होते; पण नंतर प्रिगोझिन यांच्यावर कोणताही आरोप न ठेवता त्यांना बेलारूस येथे आश्रयास जाऊ दिले जाईल, अशी भूमिका रशियाने घेतली होती.

हेही वाचा >>>‘चांद्रयान-३’ नव्या भारताच्या जिद्दीचे प्रतीक; ‘मन की बात’मध्ये मोदींचे गौरवोद्गार

अपघात की घातपात?

विमान दुर्घटनेबाबत अमेरिकेने केलेल्या प्राथमिक गुप्तचर चौकशीत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, हेतूपूर्वक घडविलेल्या स्फोटामुळे हे विमान कोसळले आहे. प्रिगोझिन यांच्या कथित हत्येमागे रशियाचे अध्यक्ष असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. रशियाने मात्र हे सर्व आरोप फेटाळले असले, तरी विमानाच्या अपघातामागील कारण मात्र तपास यंत्रणांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yevgeny prigozhin the founding head of the russian private army wagner died in a plane crash amy