योगगुरु बाबा रामदेव हे सतत आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. ठाण्यातील एका कार्यक्रमात महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका झाली होती. अशातच आता बाबा रामदेव यांनी इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. इस्लामचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. नमाज पठण केल्यावर तुम्ही हिंदू मुलींना उचलून नेऊ शकता अथवा अन्य काहीही करू शकता, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
राजस्थानमधील बाडरमेर जिल्ह्यातील पनोणिया येथे धर्मपुरी महाराज मंदिरात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, “इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. इस्लाम धर्मात ५ वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून न्या अथवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा.”
हेही वाचा : पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; BSF च्या हल्ल्यात कोसळलं!
ख्रिश्चन धर्माबद्दल बोलताना बाबा रामदेव यांनी म्हटलं, “चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असं होत नाही. असं कुराण आणि बायबलमध्ये लिहलं नाही, मात्र असं सांगितलं जातं.”
“पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे,” असं बाबा रामदेव यांनी सांगितलं.