केंद्रातर्फे चालविण्यात येणाऱ्या शाळांमध्ये यापुढे सहावी ते दहावी या इयत्तांसाठी योगाचे शिक्षण सक्तीचे करण्यात आल्याची घोषणा सोमवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केली. याशिवाय, केंद्रीय शाळांमधील शिक्षकांसाठीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातही योगा विषयाचा स्वतंत्रपणे समावेश करण्यात येणार आहे. योगाचा समावेश असलेला हा अभ्यासक्रम आणि त्याविषयीच्या साहित्य प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना स्मृती इराणी यांनी याबद्दलची माहिती दिली. दरम्यान, अभ्यासक्रमात योगा विषयासाठी ८० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांवर कोणताही अतिरिक्त भार येणार नाही, अशी ग्वाहीदेखील स्मृती इराणी यांनी यावेळी दिली. मात्र, विद्यार्थ्यांकडून ही प्रात्यक्षिके मनापासून केली गेली पाहिजेत, अशी अपेक्षा करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. अभ्यासक्रमात योगाचा समावेश करण्याबरोबरच केंद्र सरकार पुढील वर्षापासून दिल्ली येथे योगाची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्याला पाच लाखांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.   हा अभ्यासक्रम स्विकारायचा का नाही, याचा निर्णय संबंधित राज्यांवर सोपविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल सीबीएसई बोर्डामध्ये सध्या दोन तट तयार झाल्याने मंडळाशी संलग्न शाळांमध्ये हा अभ्यासक्रम राबविला जाणार की नाही, याबाबत साशंकता आहे. मात्र, केंद्राने दिलेल्या आदेशांनुसार, केंद्रीय शाळा आणि जवाहर नवोदय शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सक्तीचा करण्यात आला आहे. याशिवाय, शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमातही योगा विषयाचा समावेश करण्यासाठी आम्ही पूर्पणणे तयार असल्याचे स्मृती इराणी यांनी सांगितले. या माध्यमातून भविष्यातील गरजांचा विचार करता योगामध्ये प्रावीण्य मिळवलेल्या शिक्षकांच्या निर्मितीवर भर देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा