भारतातील योग शिबिरांमध्ये शिकलेल्या योगासनांमुळे स्वत्वाचा लागलेला शोध आणि शरीरशुद्धीचा मिळणारा आनंद यांच्या प्रेमात ‘ती’ पडली. इतकी की, आता पाकिस्तानात जाऊन तिने याच पद्धतीची योग शिबिरे भरविण्याचे निश्चित केले. आएशा छप्रा असे या युवतीचे नाव आहे.
कोण आहे आएशा?
आएशा ही कराची येथील एक योग शिक्षिका आहे. आपल्या आयुष्यातील नैराश्याने ग्रासलेल्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी तिने भारतातील योग शिबिरांना हजेरी लावली. नियमित योगासने केल्यामुळे भरकटलेल्या, नैराश्यग्रस्त जीवनाला दिशा मिळाल्याचा तसेच हवीहवीशी वाटणारी शांतता मिळाल्याचा दावा आएशाने केला आहे.
उत्तरकाशी येथील शिवानंद कुटिरात आलेल्या अनुभवाने आपले आयुष्यच बदलले आणि स्वत्वाचा शोध लागला असे आएशाने आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे. आपल्याला मिळालेला आनंद-समाधान आणि मन:शांती इतरांनाही मिळावी या भावनेने आएशाने पाकिस्तानातील खैबर पख्तुनवाला विभागात पहिले योग शिबीर भरवले. आएशा सध्या दुसरे शिबिर भरविण्याच्या तयारीत आहे.
पहिल्या योग शिबिर आयोजनाचा अनुभव
पहिले शिबिर तेही योग शास्त्रावरील, असे आयोजित करताना अडचणी नाही का आल्या या प्रश्नाचे उत्तर देताना आएशाने ठामपणे नकार दिला. चित्राल हा परिसर पर्यटनासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. शिवाय अनेकांना हिंदू कुश पर्वतराजीसारख्या निसर्गरम्य वातावरणात योगविद्येचा अनुभव घेण्याचे आकर्षण असल्याने या शिबिरास उत्तम प्रतिसाद लाभत आहे, असे आएशा म्हणाल्या.
शिबिरात काय शिकवले जाते?
* पारंपरिक योगासने
* विन्यास
* निसर्ग योग
* व्यक्तिमत्त्वास लवचिकता आणि संयतता देणारी ध्यानधारणा