योगगुरू रामदेव बाबा त्यांच्या योगाभ्यासामुळे प्रचलित आहेत. मात्र, त्यांच्या काही विधानांमुळे ते वादात आणि प्रसंगी अडचणीत सापडतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘महिलांनी कपडे घातले नाही तर त्या जास्त सुंदर दिसतात’, असं विधान करून मोठा वाद निर्माण केला होता. हे विधान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच समोर केल्यामुळे या वादाला राजकीय किनारही होती. मात्र, हा वाद शमतो न शमतो तोच बाबा रामदेव यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं. या विधानामुळे पुन्हा एकदा रामदेव बाबा अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा कुठे दाखल झालाय?

राजस्थान पोलिसांनी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात रविवारी संध्याकाळी गुन्हा दाखल केला आहे. राजस्थानच्या बरमार जिल्ह्यातील चौहतान पोलीस स्थानकात एका स्थानिक नागरिकाच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सनं पीटीआयच्या हवाल्याने दिलं आहे. भादंविच्या कलम १५३ अ, २९५ अ आणि २९८ अंतर्गत धार्मिक भावना भडकवणे, सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य करणे अशा आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“नमाज पठण करा अन् हिंदू मुलींना…”, बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

गेल्या दोन दिवसांपासून रामदेव बाबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करताना मुस्लीम धर्मीयांबद्दल केलेलं विधान वादात सापडलं होतं. “धर्मांतराच्या बाबतीत मुस्लीम आणि ख्रिश्चन समानच आहेत. मी कुणावरही टीका करत नाहीये. पण काही लोकांना इतर धर्मातून आपल्या धर्मात धर्मांतरित करण्याची फार ओढ असते”, असं रामदेव बाबा म्हणाले होते.

“इस्लाम धर्माचा अर्थ फक्त नमाज पठण करणे आहे. इस्लाम धर्मात ५ वेळा नमाज पठण केल्यावर काहीपण करु शकता. मग हिंदू मुलींना उचलून न्या अथवा दहशतवादी बनून मनात येईल ते करा. पाचवेळा नमाज पठण केल्यानंतर जन्नत मिळते. जन्नतमध्ये मद्य मिळत असेल तर, अशी जन्नत जहन्नुमपेक्षा वाईट आहे. सर्व जातीतील लोकांचा इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे”, असं ते म्हणाले होते. “चर्चमध्ये जाऊन मेणबत्ती लावल्याने सर्व पापं धुतली जातात. पण, हिंदू धर्मात असं होत नाही. असं कुराण आणि बायबलमध्ये लिहलं नाही, मात्र असं सांगितलं जातं”, असंही रामदेव बाबांनी म्हटलं होतं.

महिलांच्या कपड्यांविषयीच्या ‘त्या’ विधानामुळे रामदेव बाबा अडचणीत; महिला आयोगानं पाठवली नोटीस, दोन दिवसांत…

महिलांच्या कपड्यांविषयीचं वादग्रस्त विधान

दरम्यान, याआधीही दोन महिन्यांपूर्वी २५ नोव्हेंबर रोजी बाबा रामदेव यांनी महिलांच्या पेहेरावावरून वादग्रसत विधान केलं होतं. पतंजली आणि मुंबई महिला पतंजलि योग समितीच्या वतीने आयोजित शिबिरात बोलताना “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असं रामदेव बाबा म्हणाले होते. तसेच, “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असंही ते म्हणाले होते.

Story img Loader