पीटीआय, संयुक्त राष्ट्रे : International Day of Yoga 2023 ‘योग’ हा खऱ्या अर्थाने वैश्विक असून कुणा एकाच्या हक्कापासून मुक्त आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळय़ाला पुष्पांजली अर्पण करून पंतप्रधानांनी आपल्या अमेरिका दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर योग दिनाच्या विशेष कार्यक्रमात ते सहभागी झाले. या वेळी पंतप्रधान म्हणाले, की योगविद्येची सुरुवात भारतात झाली. तिला खूप जुनी परंपरा आहे. तुमचे वय, लिंग आणि आरोग्याच्या स्थितीनुसार तुम्ही योगसाधना करू शकता. त्यामुळेच योग हा खऱ्या अर्थाने सहजसाध्य आणि वैश्विक आहे. यानंतर आयोजित योगसत्रामध्ये पंतप्रधानांसह संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफील्ड, ७७व्या संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी, हॉलीवूड अभिनेता रिचर्ड गेर, न्यू यॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स, संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव अमिना मोहम्मद तसेच संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी, विविध देशांचे राजदूत, १८० देशांमधील विविध समाजांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
मस्क यांच्यासह विविध प्रतिष्ठितांशी संवाद
न्यूयॉर्क : जगातील कोणत्याही मोठय़ा देशापेक्षा भारत अधिक आश्वासक देश असल्याचे ‘टेस्ला’चे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क म्हणाले. मस्क यांच्यासह अमेरिकेतील साहित्य, कला, उद्योग क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठितांनी पंतप्रधानांची भेट घेतली. ‘टेस्ला’ लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न राहील, अशी घोषणा मस्क यांनी भेटीनंतर केली.
दौऱ्याचे वेळापत्रक २२ जून ‘व्हाइट हाऊस’मध्ये समारंभपूर्वक स्वागत
- अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा
- अमेरिकन प्रतिनिधी मंडळाच्या संयुक्त अधिवेशनात भाषण २३ जून अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरीस, परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांच्याबरोबर भोजन
- विविध कंपन्यांचे मुख्याधिकारी, व्यावसायिकांबरोबर व्यापाराबाबत चर्चा
- रोनाल्ड रिगन सेंटर येथे भारतीय वंशाच्या नागरिकांच्या सभेला संबोधन