अमेरिकी डॉक्टरांचा निष्कर्ष
योगासने ही भारताने जगाला दिलेली देणगी. दररोज नित्यनियमाने योगासने केल्यास उत्तम आरोग्य लाभते, आरोग्यविषयक समस्या बहुधा उद्भवत नाहीत. योगासनांचे महत्त्व आता जगालाही पटू लागले आहे. अमेरिकी डॉक्टर, आरोग्यतज्ज्ञ सातत्याने योगासनांवर अभ्यास करत असून, हार्वर्ड विद्यापीठाच्या डॉक्टरांनी तरी नियमित योगसनांमुळे आरोग्यविषयक समस्या उद्भवत नसल्याने वैद्यकीय खर्चही कमी होतो, असा निष्कर्ष काढलेला आहे.
आजारी पडू नये यासाठी काय करावे, तर योगासने करावी, असे या डॉक्टरांनी सांगितले. हार्वर्ड विद्यापीठाच्या मॅसेच्युसेट्स रुग्णालयाच्या आणि बेन्सन हेन्री इन्स्टिटय़ूटच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी योगासने, मेडिटेशन, प्रार्थना यांवर सातत्याने अभ्यास केलेला आहे. त्यासाठी त्यांनी योगासनासंदर्भात जाहीर कार्यक्रम, शिबिरे यांचे आयोजन केले होते. आरोग्याची काळजी घेण्यासाठी या गोष्टींची नितांत गरज आहे, त्यामुळे वैद्यकीय खर्चात ४३ टक्क्यांनी कपात होऊ शकते, असे या डॉक्टरांनी सांगितले.
मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी योगासने गरजेची आहेत. योगसनांमुळे चिंता आणि तणावापासून मुक्ती मिळते. त्याशिवाय रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि श्वसनाचा दाब यांवर नियंत्रण राहते. सहसा हृदयविकार व श्वसनविकार होत नाहीत, असे मॅसेच्युसेट्स रुग्णालयाच्या डॉ. जेम्स ई. स्टॉल यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा