सामान्य माणसाच्या जीवनात योगसाधनेचा समावेश झाल्यास देशातील बलात्कारांचे प्रमाण कमी होईल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेत मुरली मनोहर जोशी यांनी केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांत हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या विधानांमुळे निर्माण झालेल्या गदारोळात मुरली मनोहर जोशी यांच्या विधानाची भर पडली आहे. विशेष म्हणजे यावेळी बोलताना जोशी यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर यांनाही ‘महान योगी’ असे संबोधत मुसलमानांना दिवसातून पाचवेळा योगा करण्याचा सल्ला दिला. सामान्य माणसाच्या जीवनात योगाचा प्रवेश झाल्यास दैनंदिन जीवनातील बलात्काराच्या प्रमाणात घट होईल, असा माझा विश्वास असल्याचे जोशी यांनी म्हटले. योगामुळे स्त्री आणि पुरूष नवीन पद्धतीने विचार करू शकतील. यामुळे एखाद्याच्या मनातील मानवी शरीराविषयीच्या संकल्पना बदलतील. आपले शरीर हे एक यंत्र असून निसर्गाने एका उदात्त हेतुसाठी ते आपल्याला बहाल केल्याचे लोकांच्या लक्षात येईल, असे जोशी यांनी सांगितले. ते अमेरिकेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘द अय्यंगार वे- योगा फॉर न्यू मिलेनियम’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाऋषी महेश योगी यांच्या उपचारपद्धतीचा दाखला देत योगामुळे न्यूयॉर्कमधील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे आणि कारागृहातील कैद्यांच्या वर्तनात फरक पडल्याचेही सांगितले.
आमच्या मुस्लिम बांधवांनीही दिवसातून पाचवेळा योगा करावा. मुळात नमाज पडतानाच्या अवस्थेत योगाच्या दोन किंवा तीन प्रकारांचा समावेश असल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्यामुळेच मोहम्मद पैगंबर हे एक महान योगी असल्याचे मला वाटते. ईश्वराशी जोडणारी अशाप्रकारची योगमुद्रा शोधून काढणे त्यांना योगाच्या सरावाशिवाय शक्य नसल्याचे जोशी यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा