हा कदाचित दूरचित्रवाहिन्यांचा परिणाम असेल, पण बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जणू गर्तेत चालली होती, तोच पक्ष आता आसामच्या निवडणूक निकालानंतर अचानक आभाळास भिडला आहे. कधी छी-थू करायची तर कधी जयजयकार, हा वाहिन्यांच्या ‘अँकर’मंडळींचा आवडता खेळच. पण या चढ-उतारांच्या पलीकडला, राजकारणाचा खरा नकाशा आज कसा आहे?
निवडणुकांत कधी हार तर कधी विजय, या प्रकारे भाजप हळूहळू देशभर आपले हातपाय पसरत आहे, ही गोष्ट अगदी नि:संशय खरी. जितका आसामातील विजय महत्त्वाचा, तितकाच बंगाल आणि केरळमध्ये भाजपने गाठलेला १० टक्क्यांहून अधिक मतांचा आकडादेखील. परंतु यामुळे नरेंद्र मोदी यांचा करिष्मा सिद्ध होतो, असे मात्र नव्हे. खरे तर मोदी सरकारच्या लोकप्रियतेचा आलेख घसरणीला लागला आहे. याचे निश्चित प्रत्यंतर अर्थात, पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभांसाठी होणाऱ्या निवडणुकांत येईल. एरवीही एका राज्यातील निवडणूक निकालांचा दुसऱ्या राज्यावर काही परिणाम होत नसतो. ताज्या निवडणुकांत तर, नरेंद्र मोदी हा एकमेव हुकमी एक्का प्रचारात न वापरता भाजपने हा प्रादेशिक विजय मिळविला आहे. तामिळनाडू आणि देशातील अन्य राज्यांत भाजपला आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मात्र मेहनत करावी लागेल. एक मात्र खरे की, ‘राष्ट्रव्यापी पक्ष’ हा काँग्रेसचा दर्जा आता भाजप हळूहळू हस्तगत करू लागला आहे. राष्ट्रीय राजकारणासाठी या निकालांचा जर काही स्पष्ट आणि ठोस संकेत असेल तर तो हा की, काँग्रेसच हरते आहे. काँग्रेस गटांगळ्या खाऊ लागल्याचेच संकेत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून पुढल्या प्रत्येक निवडणुकीत मिळालेले आहेत. केरळमध्ये काँग्रेस हरली, त्याची ‘सामान्य सत्तापालट’ अशी भलामण केली जाऊ शकते.. किंवा, आसामात १५ वर्षे काँग्रेसचेच राज्य असल्याने मतदार कंटाळले होते, असा तर्क मांडला जाऊ शकतो. पण मग, याच ‘सामान्य सत्तापालटा’च्या न्यायाने काँग्रेसला तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये यश मिळायला हवे होते. तसे काही झालेले नाहीच. उलट, प्रत्येक राज्यात बुडत्या काँग्रेसचा बोजा त्या-त्या ठिकाणच्या सहयोगी पक्षांवर पडल्याचे दिसून आले. केरळ आणि तामिळनाडूत या वेळी काँग्रेसची कामगिरी सहयोगी पक्षांपेक्षा कमीच होती. पश्चिम बंगालात डाव्यांपेक्षा अधिक जागा काँग्रेसला मिळाल्या खऱ्या, पण आपली मते डाव्यांकडेही हस्तांतरित करण्यात काँग्रेस निष्प्रभ ठरली. यावरून हे स्पष्ट होते की, आघाडीच्या राजकारणात काँग्रेस हे एक लोढणेच ठरते आहे.
काँग्रेस अशी झपाटय़ाने आक्रसत असताना, तेथे तयार होणारी पोकळी कोण भरून काढणार? या मोठय़ा प्रश्नाचे नेमके उत्तर ताज्या निवडणूक निकालांतून मिळत नाही. काँग्रेस आणि भाजप यांच्यापेक्षा निराळे पर्याय म्हणून उभे राहिलेले विचार संथगतीने लोप पावताना दिसतात. डावे पक्ष केरळमध्ये जिंकले खरे, पण डाव्यांचा केरळमधील विजय किंवा पश्चिम बंगालमधील पराभव या दोन्हींशी डाव्या विचारधारेचे काहीही देणेघेणे नाही. उलट डावे पक्षच या भांडवलआधारित लोकशाहीमधल्या कुणाही अन्य पक्षांपैकी एक बनून राहिले आहेत. दुसरीकडे, अण्णा द्रमुकच्या विजयानंतरच्या पूजाअर्चा आणि प्रचाराचे एकंदर स्वरूप पाहता हेच स्पष्ट होते की, द्रमुक असो किंवा अण्णा द्रमुक – यांचा द्रविड आंदोलनाच्या वैचारिक वारशाशी काहीही संबंध उरलेला नाही. पेरियारप्रणीत द्रविड आंदोलनाच्या विचारधारेतील नास्तिकवाद, तर्काधिष्ठितता, जातिनिर्मूलनाचा आग्रह या गोष्टी आता स्वप्नवतच वाटू लागल्या आहेत.
तिकडे आसामात, ‘आसाम गण परिषद’ या पक्षाला निवडणूक जिंकता आली खरी, पण असमिया अस्मितेचा आपला आग्रह सोडल्यावरच. १९८०च्या दशकात स्थलांतरितांचा प्रश्न धसाला लावून दाखवणारा हा पक्ष, अद्यापही त्या प्रश्नाचे उत्तर शोधू शकलेला नाही. आज आसाम गण परिषदेला भाजपच्या मांडीवर बसणे भाग पडते आहे, याचा अर्थ असा की हा आसाम गण परिषदेच्या राजकारणाचा पराभवच होय. आज असे दिसते की, राष्ट्रीय पातळीवर निर्विवाद सत्ता असलेला एक पक्ष आहे, पण विरोधी पक्षाची जागा रिकामीच होत चालली आहे. वर्चस्वाचा विचार तर आहे; पण पर्यायी विचाराच्या जागी शून्यच दिसते. प्रश्न हा आहे की, या शून्याला निव्वळ पक्षापक्षांची मोट बांधून त्यांना ‘समविचारी’ समजत राहायचे, की खऱ्या अर्थाने पर्यायी राजकारणाने यास प्रत्युत्तर द्यायचे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वाहिन्यांवरच्या अनंतकाळ चालणाऱ्या चर्चामधून मिळणार नाही. उलट, टीव्ही बंद करून तुम्हालाच विचार करावा लागेल. रवीश कुमारांच्या गाजलेल्या ओळी वापरून सांगायचे तर, ‘टीवी कम देखा कीजिए’!
* ‘राष्ट्रव्यापी पक्ष’ हा काँग्रेसचा दर्जा आता भाजप हळूहळू हस्तगत करू लागला आहे. राष्ट्रीय राजकारणासाठी या निकालांचा जर काही स्पष्ट आणि ठोस संकेत असेल तर तो हा की, काँग्रेसच हरते आहे..
* काँग्रेस आणि भाजप यांच्यापेक्षा निराळे पर्याय म्हणून उभे राहिलेले विचार संथगतीने लोप पावताना दिसतात. डाव्यांच्या जय किंवा पराजयाशी विचारधारेचा काही संबंध उरलेला नाही. अण्णाद्रमुक किंवा द्रमुकचा द्रविडी विचारवारशाशी संबंध उरलेला नाही आणि आसाम गण परिषद तर भाजपच्याच मांडीवर बसली आहे..
योगेंद्र यादव
(लेखक ‘स्वराज अभियान’चे संयोजक आहेत. ई-मेल : yogendra.yadav@gmail.com