पक्षाने आपल्याला बजावलेली कारणे दाखवा नोटीस म्हणजे ‘विनोद’ असल्याचे पक्षातून हकालपट्टीच्या मार्गावर असलेले आम आदमी पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.
राष्ट्रीय शिस्तभंग समितीचे अध्यक्ष दिनेश वाघेला यांना कल्पना न देता समितीने हे पाऊल कसे उचलले, याबद्दल यादव यांनी आश्चर्य व्यक्त केले. ही कारणे दाखवा नोटीस आपल्याला मिळण्यापूर्वीच तिचे तपशील प्रसारमाध्यमांना कसे कळले, असा प्रश्न विचारून समितीच्या सदस्यांनीच ही माहिती फोडल्याचा आरोप त्यांनी केला. आपले वाघेला यांच्याशी दूरध्वनीवर बोलणे झाले असता, आपण दिल्लीत नसून समितीने अद्याप या विषयाबाबत विचार केलेला नाही असे त्यांनी सांगितल्याचा दावा यादव यांनी केला.
पक्षाबाबत काही संवेदनशील माहिती प्रसारमाध्यमांकडे उघड केल्याबद्दल आपल्याला ही नोटीस बजावण्यात आली, मात्र या नोटीसबद्दल आपल्याला प्रसारमाध्यमांमधूनच कळले, असे यादव उपरोधिकपणे म्हणाले. शुक्रवारी रात्री १० वाजेपर्यंत माध्यमांना चारही पत्रांचे तपशील कळले होते. समितीच्या कुणा सदस्याने ही माहिती फोडल्याशिवाय असे होऊ शकते काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. तक्रारकर्ते आणि साक्षीदार हेच न्यायाधीश झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे काय, असे त्यांनी आशीष खेतान व पंकज गुप्ता यांच्यासह समितीच्या इतर सदस्यांच्या संदर्भात विचारले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav calls show cause notice a joke