स्वराज अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांना दिल्ली पोलीसांनी सोमवारी रात्री उशीरा जंतर-मंतरवरून ताब्यात घेतले. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या शेतकऱयांचे योगेंद्र यादव यांच्या नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर आंदोलन सुरू होते. हा परिसर रिकामा करावा, अशी सूचना पोलीसांनी योगेंद्र यादव यांना केली होती. मात्र, त्यांनी पोलीसांच्या नोटिसीला कोणताही प्रतिसाद न दिल्याने रात्री उशीरा त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
पोलीसांनी आपल्या मारहाण केली, धक्काबुक्की केली आणि पोलीस ठाण्यात आणल्याचे योगेंद्र यादव यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून रात्री एक वाजता सांगितले. या घटनेची माहिती मिळताच योगेंद्र यादव यांचे सहकारी प्रशांत भूषण आणि इतर कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले. योगेंद्र यादव यांना कोणत्या कलमांखाली ताब्यात घेण्यात आले आहे, अशी विचारणा प्रशांत भूषण यांनी पोलीसांकडे केली. पोलीसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्यावर या कार्यकर्त्यांनी तिथेच ठिय्या मांडला. मंगळवारी सकाळी पोलीसांनी यादव आणि ताब्यात घेतलेल्या इतर कार्यकर्त्यांची सुटका केली. मात्र, पोलीस कारवाईचा निषेध म्हणून या सर्वांनी पोलीस ठाण्यातून जाण्यास नकार देत तिथेच आंदोलन सुरू केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा