आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या प्रा. योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात हरयाणातील ठिकरीवाल गावातून सुरू झालेला ‘जय किसान’ ट्रॅक्टर मोर्चा सोमवारी संसदेवर धडकणार आहे. पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांना एकत्र करून प्रा. यादव यांनी सरकारी जमीन अधिग्रहण विधेयकास आव्हान दिले आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या याही ट्रॅक्टर यात्रेत प्रत्येक गावातून मूठभर माती गोळा करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यास आव्हान देण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याची भूमिका प्रा. यादव यांनी चंदिगढमध्ये पत्रकार परिषदेत मांडली. दिल्लीत जंतरमंतरवर यादव यांची सोमवारी सभा होणार आहे.
एकीकडे शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्याचे आश्वासन देणारे केंद्र सरकार प्रत्यक्षात पंजाब व हरयाणामध्ये राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करताना जुन्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत आहे. हा सरळ-सरळ शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे यादव म्हणाले. यादव यांची ट्रॅॅक्टर यात्रा बरनाला, संगरूर, नाभा, पटियाला, अंबाला, कुरुक्षेत्र, करनाल, सोनीपत, पानिपत, बागपत, मेरठ, बुलंदशहरमार्गे दिल्लीत धडकणार आहे. आम आदमी पक्षातून निलंबित झाल्यानंतर प्रा. यादव यांनी हरयाणा व पंजाबमध्ये जम बसविण्यास सुरुवात केली. अद्याप कोणताही राजकीय पक्ष यादव यांनी स्थापन केला नसला तरी सध्या जमीन अधिग्रहणाच्या मुद्दय़ावर त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले आहे. स्वराज अभियान सुरू करून यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आव्हान दिले आहे. दिल्लीतील रेसकोर्सची जमीन १९१२ साली शेतकऱ्यांवर गोळ्या झाडून हडप करण्यात आली होती. त्यामुळे ही जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी यादव यांनी पंतप्रधानांकडे केली आहे. ही जागा परत न मिळाल्यास आम्ही ती ताब्यात घेऊ व तेथे शेतकऱ्यांसाठी भव्य स्मारक बनवू, असा इशारा यादव यांनी सरकारला दिला आहे.
योगेंद्र यादव यांचा मोर्चा उद्या दिल्लीत धडकणार
आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या प्रा. योगेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली जमीन अधिग्रहण कायद्याविरोधात हरयाणातील ठिकरीवाल गावातून सुरू झालेला ‘जय किसान’ ट्रॅक्टर मोर्चा सोमवारी संसदेवर धडकणार
First published on: 09-08-2015 at 01:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yogendra yadav march hit in delhi tomorrow