मी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा या निव्वळ अफवा आहेत. मी पक्षातच आहे आणि पूर्वीपेक्षाही अधिक जोमाने काम करण्यास कटिबद्ध आहे,’ असे ‘आम आदमी पार्टी’चे (आप) वरिष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी आज (शनिवार) सायंकाळी ट्विटरवरून स्पष्ट केले. 



राष्ट्रीय राजकारणात एकेकाळी प्रचंड उलथापालथ घडवून आणणाऱ्या आम आदमी पक्ष (आप)च्या पडझडीला  काही दिवसांपूर्वी सुरूवात झाली होती. गेल्याच आठवड्यात पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असणाऱ्या शाझिया इल्मी यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीचे कारण पुढे करत पक्षातून काढता पाय घेतला होता. या धक्क्यातून पक्ष सावरतो नाही तोच पक्षाचे प्रवक्ते योगेंद्र यादव यांनी शनिवारी ‘आप’मधील पक्षसदस्यत्वाचा राजीनाम्याची बातमी येऊन धडकल्याने  पक्षाला मोठा धक्का बसला.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या हरियाणामधील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत योगेंद्र यादव यांनी राजीनामा दिल्याची बातमी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांत पसरली होती. यादव यांच्यापाठोपाठ हिस्सार येथील ‘आप’तर्फे निवडणूक लढविलेल्या नवीन जयहिंद यांनीही पक्षाचा राजीनामा दिल्याची चर्चा होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव आणि जयहिंद या दोघांमध्येही काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्यामुळेच दोघांनीही पक्षातील पदाचा राजीनामा दिल्याचा दावाही केला जात होता. ‘योगेंद्र यादव यांना माझ्यापासून इतकी समस्या निर्माण असेल, तर मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन,’ अशी प्रतिक्रिया जयहिंद यांनी व्यक्त केली. 
यापूर्वी जनलोकपालच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेच्या सत्तेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतसुद्धा पक्षाला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.  अरविंद केजरीवाल यांच्या सततच्या आंदोलनाच्या आणि धरसोडीच्या राजकारणला कंटाळल्यामुळे जनतेने लोकसभा निवडणुकीत ‘आप’ला पूर्णपणे नाकारले होते.  
गेल्याच आठवड्यात शाझिया इल्मींच्या राजीनाम्यामुळे आपला एक झटका मिळालेला होता. पक्षातंर्गत लोकशाहीचा अभाव असल्याची टीका करत शाझिया इल्मी यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर  प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या  राजीनाम्यानंतर योगेंद्र यादव यांनी “गेल्या काही महिन्यांपासून शाझिया पक्षावर नाराज होत्या. मी त्यांना राजीनामा न देण्याचा आणि थोडी प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला होता. पण, त्यांनी माझे न ऐकता राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा पक्षासाठी दु:खद बाब आहे,” अशी प्रतिक्रिया दिली होती. 

Story img Loader