पीटीआय, नवी दिल्ली
एनसीईआरटीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकावर लेखक म्हणून आपली नावे छापण्यावर योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एनसीईआरटीला पत्र पाठविले आहे. पाठ्यपुस्तकांवर नाव असणे ही एकेकाळी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. मात्र आता तीच गोष्ट लाजीरवाणी झाली आहे, अशा शब्दांत दोघांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एनसीईआरटीने ११वी आणि १२वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकांत यंदा काही बदल केले आहेत. यावरून विरोधी पक्ष तसेच शैक्षणिक क्षेत्रातून टीका होत असताना आता पुस्तकावर लेखक म्हणून नाव असलेल्या दोन शिक्षणतज्ज्ञांनी एनसीईआरटीला पत्र पाठवून आपली भूमिका मांडली आहे. आपली नावे वापरून राजकीयदृष्ट्या पक्षपाती, शैक्षणिकदृष्ट्या अकार्यक्षम पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ नयेत. आपल्या नावांसह पाठ्यपुस्तके वितरित झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. यादव व पळशीकर हे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाचे मुख्य सल्लागार होते. गतवर्षी पाठ्यपुस्तकांमध्ये बदल केल्यानंतर दोघांनी त्यावर तीव्र शब्दांत टीका केली होती. यापूर्वी पुस्तकात सुधारण करताना काही मजकूर वगळण्याची पद्धत होती. मात्र आता एनसीईआरटीने मोठी भर घालणे, पुनर्लेखन असे प्रकार सुरू केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
एखाद्या पुस्तकाचा लेखक कोण, यावरून वाद आणि चर्चा होऊ शकतात. मात्र आपले कामच वाटू नये, अशा पुस्तकांत बळजबरीने लेखक-प्रकाशकांची नावे छापणे विचित्र आहे. – योगेंद्र यादव, सुहास पळशीकर