निवडणुकीचे कवित्व संपल्यानंतर आता आम आदमी पक्षामध्ये संदोपसुंदी माजली आहे. पक्षाचे समन्वयक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल क्रेंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात न्यायालयाच्या चकरा मारत आहेत; तर इतर नेते दुसऱ्या क्रमांकाचे पद मिळवण्यासाठी हमरीतुमरीवर आले आहेत. प्रा. योगेंद्र यादव यांनी पक्षांतर्गत वाद चव्हाटय़ावर आणले म्हणून मनीष सिसोदिया यांनी त्यांची ई-मेलद्वारे ‘कानउघाडणी’ केली आहे.
 पक्षाचे निर्णय घेणाऱ्या राजकीय व्यवहार समितीमध्ये (पीएसी) होणाऱ्या चर्चेत माझे ऐकले जात नाही, असा आरोप यादव यांनी केला होता. त्यास सिसोदिया यांनी उत्तर दिले आहे. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या यादव व सिसोदिया यांच्यातून विस्तव जात नाही. दोन्ही नेत्यांना पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे पद हवे आहे. ज्यास केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत महत्त्व येते, असा उभय नेत्यांचा समज आहे.
आम आदमी पक्षाचे सर्व निर्णय पीएसीमध्ये होतात. पीएसीच्या बैठकीत सुचवलेल्या कित्येक सुधारणांवर विचार केला जात नाही. शिवाय निर्णयप्रक्रियेत ऐकून घेतले जात नाही, असा आरोप प्रा. यादव यांनी केजरीवाल यांच्यावर केला होता. त्यास उत्तर देताना सिसोदिया यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. यादव यांना पाठवलेल्या मेलमध्ये सिसोदिया यांनी म्हटले आहे की, हरयाणामधील नेते नवीन जयहिंद यांच्याशी तुमचे पटत नाही. त्यांच्याशी असलेले मतभेद तुम्ही माध्यमांद्वारे चव्हाटय़ावर आणलेत. जयहिंद यांच्याशी असलेल्या मतभेदांमध्ये अकारण केजरीवाल यांना ओढत असल्याचा आरोप सिसोदिया यांनी केला आहे.
आम आदमी पक्षात कर्नाटकपासून थेट पंजाबपर्यंत सर्वत्र ‘अराजक’ माजले असताना या पक्षाच्या प. बंगाल शाखेने मात्र हे अराजक शिताफीने टाळले आहे. आपची संपूर्ण प. बंगाल शाखाच भाजपामध्ये विलीन झाल्याने हे अराजक टळले आहे. लोकांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी भाजप हेच एकमेव व्यासपीठ आहे, अशी प्रतिक्रिया आपचे प. बंगालमधील नेते अमित कुमार यांनी दिली. राज्यात तृणमूल काँग्रेसच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही भाजपमध्ये विलीन होत आहोत, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader