येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. दरम्यान, या राम मंदिरावरून आणि मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मंदिर समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्रिमंडळ, वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षांमधील मोठे नेते, क्रिकेटपटू, कलाकार आणि देशभरातील साधू-संतांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. काँग्रेसलाही या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. परंतु, काँग्रेसने या कार्यक्रमाला राजकीय इव्हेंट म्हणत स्पष्ट केलं आहे की त्यांच्या पक्षाकडून या सोहळ्याला कोणीही उपस्थित राहणार नाही. दरम्यान, राम मंदिरासाठी अनेक वर्षे लढणाऱ्या शिवसेनेला (ठाकरे गट) या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेने भाजपा सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दावा केला आहे की, अयोध्येमध्ये ज्या ठिकाणी वादग्रस्त बबरी मशीद होती त्या ठिकाणी राम मंदिर उभारलं जात नाहीये. ज्या बाबरीविरोधात देशातल्या विविध पक्षांनी, संघटनांनी अनेक दशकं आंदोलनं केली, त्या बाबरीच्या जागेवर मंदिर बांधलं जात नाहीये. ‘मंदिर वहीं बनाएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ (मंदिर तिथेच बांधणार) असं ते लोक सतत बोलायचे आणि त्यानंतर वादग्रस्त इमारत पाडण्यात आली. परंतु, आता मंदिर तिथे न बांधता बाबरीपासून तीन किलोमीटर दूर बांधलं जात आहे. भाजपा सरकार असं का करतंय?
संजय राऊत म्हणाले, बाबरीचा घुमट ज्या ठिकाणी होता तेच रामलल्लांचं जन्मस्थान आहे. त्या ठिकाणी मंदिराचा गाभारा असायला हवा. परंतु, घुमटाच्या ठिकाणी मंदिराचा गाभारा नाही. संजय राऊत यांच्या या दाव्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्यनाथ यांनी काही वेळापूर्वी आज तक या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, मंदिर त्याच ठिकाणी बांधलं जात आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघेही यापूर्वी त्या ठिकाणी अनेकदा आले आहेत.
हे ही वाचा >> Ram Mandir : अयोध्येला न जाता कसा पाहू शकता श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा? घरबसल्या कसे घेऊ शकता प्रभु रामाचे दर्शन?
योगी आदित्यनाथ म्हणाले, राऊत आणि ठाकरे अलीकडेच अयोध्येला आले होते. तेव्हा त्यांनी हा अमूल्य सल्ला का दिला नाही? आम्ही इतकी वर्षे त्या जागेसाठीच लढलो आहोत. आम्ही म्हणायचो, रामलल्ला हम आएंगे, मंदिर वहीं बनाएंगे’ और मंदिर अब वहीं पर बन रहा है. (रामलल्ला आम्ही येणार, मंदिर तिथेच बांधणार, आता मंदिर त्याच ठिकाणी बांधलं जात आहे.)