Yogi Adityanath Agra Speech : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा शहरात उभारण्यात आलेल्या वीर दुर्गादास राठोड यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं आज (सोमवार, २६ ऑगस्ट) लोकार्पण केलं. यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना आदित्यनाथ म्हणाले, “आपल्यासाठी राष्ट्र प्रथम असलं पाहिजे. राष्ट्रापेक्षा मोठं काही असूच शकत नाही. आपण एकजुटीने राहू, चांगलं आचरण करू तेव्हाच आपलं राष्ट्र मजबूत होईल. तुम्ही विभागले गेलात, तर कापले जाल. एकत्र राहिलात तर सुरक्षित राहाल. बांगलादेशमधील परिस्थिती तुम्ही पाहत आहातच. त्यातून आपण शिकायला हवं”.
योगी आदित्यनाथ म्हणाले, “बांगलादेशमधील लोकांनी ज्या चुका केल्या, त्या चुका आपल्या हातून इथे (भारतात) व्हायला नकोत. आपण एकसंध राहिलो तर सुरक्षित राहू शकतो. आपलं विभाजन झालं तर आपण कापले जाऊ. आपल्याला विकसित भारताच्या संकल्पनेसाठी कार्य करायचं आहे. मी दुर्गादास राठोड यांना कोटी कोटी नमन करतो आणि सर्वांना एकतेचा संदेश देतो. राष्ट्राप्रती समर्पण आणि खरी श्रद्धा कशी असावी याचं उदाहरण म्हणजे दुर्गादास राठोड. त्यांनी त्यांचं शौर्य व पराक्रमातून दाखवून दिलं की राष्ट्राहून अधिक महत्त्वाचं काहीच नसतं. तोच भाव आपल्या मनात सदैव राहिला पाहिजे”.
याच आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला आव्हान दिलं होतं : योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुघल बादशाह औरंगजेबाचा दुष्ट असा उल्लेख केला. ते म्हणाले, “औरंगजेबही या आग्र्याशी संबंधित होता. याच आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या जुलमी सत्तेला आव्हान दिलं होतं. महाराज त्याला म्हणाले होते, ‘तू उंदरासारखा तडफडत राहशील. आम्ही तुला भारत काबीज करू देणार नाही’. त्याच काळात जोधपूरचे राजे जसवंत सिंह हे देखील मातृभूमीसाठी लढत होते. वीर दुर्गादास राठोड हे जसवंत सिंह यांच्या सैन्याचे सेनापती होते. औरंगजेबाने अनेकदा जोधपूरवर हल्ला केला. जोधपूर काबीज करण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु, प्रत्येक वेळी त्याला अपयश आलं. कारण, जिथे दुर्गादास यांच्यासारखे वीर उभे होते, तिथे औरंगजेबाला यश मिळणं अशक्य होतं”.
यावेळी योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच संकल्पांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आम्ही गुलामीची प्रतीकं नष्ट करू, आपल्या वीरांचा, सैनिकांचा सन्मान करू, देशातील एकता व एकात्मतेसाठी काम करू, कोणलाही समाजात द्वेष पसरवू देणार नाही, जात, भाषा, प्रदेशाच्या नावावर लोकांमध्ये फूट पडू देणार नाही. भारताला जगातील सर्वात मोठी शक्ती बनवू”.