महापुरुषांच्या जयंतीला शाळा आणि सरकारी कार्यालयाला मिळणाऱ्या सुट्ट्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंद केल्या आहेत. जयंती आणि पुण्यतिथीला असणाऱ्या एकूण १५ सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेशचे ऊर्जा मंत्री श्रीकांत शर्मा यांनी दिली. सुट्टीच्या ऐवजी एक तासाचा कार्यक्रम घेण्यात येईल असे शर्मा यांनी म्हटले. शालेय सुट्ट्यांचे प्रमाण वाढल्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण होत नाही अशी चिंता आदित्यनाथ यांनी व्यक्त केली होती. अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून सुट्ट्या कमी कराव्या लागतील असे आदित्यनाथ यांनी म्हटले होते. तसेच महापुरुषांची जयंती ही त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण म्हणून साजरी केली जावी असे आदित्यनाथ यांनी म्हटले होते.  महापुरूषांच्या जयंतीला शाळांना सुट्टी न देता विद्यार्थ्यांना शाळेत बोलवावे. जेणेकरून त्यांना त्यादिवशी महापुरूषांबद्दल चार गोष्टी शिकवता येतील, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

यापूर्वी योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शिक्षणात नवनवीन बदल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता शाळांमध्ये योग शिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार शारीरिक शिक्षणातील अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा समावेश करण्यात आला आहे. शारीरिक शिक्षण राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये बंधनकारक करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे गिरवावे लागणार आहेत. तसेच राज्यातील शाळांमध्ये आता नर्सरीपासूनच इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय यूपी सरकारने घेतला आहे. सध्या उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून इंग्रजीचे शिक्षण दिले जात आहे. शिक्षण व्यवस्थेत संस्कृती आणि आधुनिकता यांच्यात समतोल साधायला हवा, असे योगी आदित्यनाथ यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. योगी आदित्यनाथ यांनी शालेय शिक्षण विभागात पारदर्शकतेला प्राधान्य दिले आहे. राज्यातील शाळांमध्ये पारदर्शीपणे शिक्षक भरती करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. परीक्षांच्या कालावधीत कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे करडी नजर ठेवण्यात येणार आहे.