Yogi Adityanath on Mahakumbh Profits: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याची नुकतीच सांगता झाली. कोट्यवधी भाविकांनी यावेळी महाकुंभ मेळ्यादरम्यान गंगा, यमुना, सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान केल्याची आकडेवारी उत्तर प्रदेश सरकारकडून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे महाकुंभ मेळा भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरला असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळातदेखील सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून वाद रंगल्याचं दिसून येत आहे. महाकुंभ मेळ्याच्या आयोजनातील त्रुटी, चेंगराचेंगरी किंवा आग लागण्याच्या घटना, भाविकांचा मनस्ताप असे मुद्दे उपस्थित करून विरोधकांकडून टीका केली जात असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सादर केलेली आकडेवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात एका चर्चेदम्यान महाकुंभमेळ्यातील आर्थिक व्यवहारांबाबतची एक आकडेवारी सादर केली आहे. महाकुंभ मेळ्यात किती मोठ्या प्रमाणावर रोजगार व आर्थिक उत्पन्न वाढलं, यासंदर्भात माहिती देताना योगी आदित्यनाथ यांनी माहरा नावाच्या एका कुटुंबाची कथा सांगितली. त्यानुसार महाकुंभमेळ्याच्या अवघ्या ४५ दिवसांमध्ये या कुटुंबानं तब्बल ३० कोटी रुपयांची कमाई केल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले.

१३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या ४५ दिवसांमध्ये प्रयागराज येथे महाकुंभमेळा पार पडला. यादरम्यान, नद्यांवर फेरी बोटीची सेवा पुरवणाऱ्या माहरा कुटुंबाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी उदाहरणादाखल उत्तर प्रदेशच्या विधिमंडळात दिली. या मेळ्याच्या निमित्ताने प्रयागराजमधील नावाड्यांचं आर्थिक शोषण झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर त्यावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

माहरा कुटुंबाच्या मालकीच्या जवळपास १३० बोटी आहेत. या प्रत्येक बोटीने दिवसाला सरासरी ५० ते ५२ हजारांची कमाई केली. महाकुंभमेळा संपेपर्यंत प्रत्येक बोटीच्या कमाईचा आकडा जवळपास दोन ते अडीच कोटी होता. त्यामुळे माहरा कुटुंबाकडील सर्व बोटींची महाकुंभमेळ्यातील एकूण कमाई जवळपास ३० कोटींच्या घरात गेली, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत दिली. या कुंभमेळ्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

यंदाच्या महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी उत्तर प्रदेश सरकारनं तब्बल ७ हजार ५०० कोटींचा निधी दिला होता. यात कुंभमेळ्यासाठी लागणारी व्यवस्था, सोयी-सुविधांची उभारणी व इतर बाबींवरील खर्चाचा समावेश होता. पण त्या गुंतवणुकीवर जवळपास ३ लाख कोटींची उलाढाल झाली, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. यात हॉटेल उद्योग (४० हजार कोटी), अन्नपदार्थ व इतर दैनंदिन वस्तूंचे उद्योग (३३ हजार कोटी) आणि वाहतूक व्यवसाय (१.५ लाख कोटी) या तीन उद्योगांना सर्वाधिक फायदा झाला, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.

Story img Loader