पीटीआय, प्रयागराज
प्रयागराजमध्ये बुधवारी संपन्न झालेला महाकुंभ हा खराखुरा जागतिक सोहळा होता असे मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी व्यक्त केले. तसेच महाकुंभाच्या यशस्वी आयोजनाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा कुंभमेळा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा असल्याचे वर्णन करण्यात येत आहे. त्याची सांगता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाकुंभाच्या यशस्वी आयोजनामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांनी माध्यमांचेही आभार मानले.
महाकुंभादरम्यान श्रद्धा आणि अर्थव्यवस्थेची सांगड घालण्याची संकल्पना नरेंद्र मोदी यांची होती असे त्यांनी सांगितले. धार्मिक पर्यटनामध्ये मोठी क्षमता असून या संधीचा वापर करून घेण्यासाठी उत्तर प्रदेश हे सर्वात योग्य राज्य म्हणून उदयाला येत असल्याचे आदित्यनाथ म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, महाकुंभामुळे उत्तर प्रदेशात पाच प्रमुख आध्यात्मिक पर्यटनाचे कॉरिडॉर विकसित झाले. पहिल्या कॉरिडॉरमध्ये वाराणसी आणि मिर्झापूर प्रयागराजद्वारे अयोध्या आणि गोरखपूरला जोडले गेले. दुसऱ्या कॉरिडॉरमध्ये लालापूर आणि चित्रकूट ही स्थळे प्रयागराजला जोडली गेली. तिसऱ्यात लखनऊ व नैमिषारण्य ते प्रयागराज; चौथ्यात बुंदेलखंड द्रुतगती मार्गाच्या माध्यमातून प्रयागराज व आग्रा जोडले गेले. त्याचा मथुरा, वृंदावन आणि सुखतीर्थापर्यंत विकास झाल्याचे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
धार्मिक पर्यटनासाठी उत्तर प्रदेश आघाडीवर!
मुख्यमंत्र्यानी सांगितले की, एकट्या २०२४ या वर्षात ६४ कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यामध्ये अयोध्या, वाराणसी, मथुरा, प्रयागराज, चित्रकूट, विंध्याचल, गोरखपूर आणि नैमिषारण्य यांचा समावेश होता. तर गेल्या ४५ दिवसांमध्ये ६६ कोटी पर्यटकांनी महाकुंभासाठी प्रयागराजला भेट दिल्याचा दावाही योगी आदित्यनाथ यांनी केला.
रेल्वेच्या १६ हजारांहून अधिक गाड्या
महाकुंभासाठी आलेल्या पाच कोटी भाविकांसाठी १६ हजारांहून अधिक गाड्या चालवण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. २०१९ला कुंभमेळ्यासाठी सुमारे ४ हजार गाड्या चालवण्यात आल्या होत्या. यावेळी आम्ही त्याच्या तिप्पट गाड्या चालवण्याचे ध्येय ठेवले होते, प्रत्यक्षात चार पट गाड्या चालवण्यात आल्या. त्यासाठी अडीच वर्षांपासून काम सुरू असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.
प्रयागराजमधील महाकुंभ हा खराखुरा जागतिक सोहळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाला याचे श्रेय जाते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला हा महासोहळा यशस्वीपणे आयोजित करता आला. – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश