अयोध्येतील शरयू नदीच्या काठावर श्रीरामाचा १०० मीटर उंचीचा भव्य पुतळा बसवण्याची तयारी योगी सरकारकडून करण्यात येते आहे. ‘नव्य अयोध्या’ या योजने अंतर्गत धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यासाठी यासंदर्भातला एक प्रस्ताव राज्यापाल राम नाईक यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या बातमीनुसार, पुतळ्याची उंची १०० मीटर असण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप या उंचीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. उत्तर प्रदेश राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये १८ ऑक्टोबरच्या दिवाळी सोहळ्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अलफोन्स आणि सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा दिवाळी महोत्सवात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या संमतीनंतरच या पुतळ्याचे काम सुरु केले जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवादासोबत अद्याप कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही अशीही माहिती समोर येते आहे.
श्रीरामचंद्राच्या भव्य पुतळ्यासोबतच रामकथा गॅलरीचाही प्रस्तावात उल्लेख आहे. ही गॅलरीही शरयू नदीच्या काठावरच उभारली जाणार आहे. दिगंबर आखाड्याने दिलेल्या ऑडिटोरियमचाही उल्लेख या प्रस्तावात करण्यात आला आहे. अयोध्येचा विकास करण्यासंदर्भातील प्रकल्पाचा १९५.८९ कोटींचा आराखडा उत्तर प्रदेश राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला आहे. ज्यापैकी १३३.७० कोटींचा निधी केंद्राने राज्याला दिला आहे.
१८ ऑक्टोबरला होणाऱ्या दिवाळी महोत्सवात तेथील विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात येईल. या दिवशी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात थायलँड आणि इंडोनेशिया येथील कलाकारही त्यांची कला सादर करतील.