बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याची दहशतवादी हाफिज सईदची तुलना करणारे भाजप खासदार योगी आदित्यनाथ हे भाजपमधील दिग्विजय सिंह असल्याचे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे.

देशात टोकाची असहिष्णुता असल्याचे वक्तव्य शाहरुखने त्याच्या वाढदिवशी केले होते. त्यानंतर शाहरुखवर टीका होण्यास सुरूवात झाली. शाहरूख आणि सईद यांची भाषा एकच आहे. त्यामुळे सईदने निमंत्रण दिलेच असेल तर आता शाहरुखला पाकिस्तानला जायला हरकत नाही, असे आदित्यनाथ यांनी म्हटले.

शाहरुख टीकेच्या केंद्रस्थानी सापडला असताना बॉलीवूड कलाकार त्याच्या पाठिशी उभे राहिले आहेत. अनुपम खेर यांनी शाहरुखचा टिकेपासून बचाव करताना आदित्यनाथ यांनी केलेले विधान दुर्देवी असल्याचे म्हटले. शाहरुख हा सच्चा भारतीय असून त्याला देशाबद्दल प्रेम आहे. संपूर्ण देशाला तो आदर्शस्थानी आहे. कधीकधी मला योगी आदित्यनाथ हे भाजपमधील दिग्विजय सिंह वाटतात. भाजपमधील काही नेत्यांना खरचं आपल्या जीभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज असून शाहरुखविरोधात गरळ ओकणे बंद करावे, असेही अनुपम म्हणाले.

Story img Loader