विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात आता पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. या मोठ्या यशाचं सेलिब्रेशनही भाजपाकडून जोरदार होणार आहे. योगी आदित्यनाथ यांचा शपथविधी धुमधडाक्यात आणि मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यासाठी अनेक मोठमोठे लोक उपस्थित राहणार आहेत.
योगी आदित्यनाथ २५ मार्च रोजी लखनौच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्यामध्ये १२ राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. याशिवाय योगगुरू रामदेव बाबा तसंच विविध मठ आणि मंदिरांचे महंतही उपस्थित राहणार आहेत. एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या सोहळ्यासाठी टाटा गृपचे एन. चंद्रशेखरन, महिंद्रा गृपचे आनंद महिंद्रा, बिर्ला गृपचे कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह गौतम अदानी आणि नीरज अंबानी हेही सहभागी होणार आहेत.
या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. त्यापैकी आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी २०० अति महत्त्वाच्या व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव, बसपा अध्यक्षा मायावती यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रणे धाडण्यात आली आहेत.
शपथविधी सोहळ्यासाठी जाणाऱ्या सर्वांना आपल्या गाड्यांवर भाजपाचा झेंडा लावण्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. समारंभाच्या ठिकाणाजवळ ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. एटीएस कमांडोही सुरक्षेसाठी उपस्थित असतील, त्याचबरोबर सशस्त्र पोलीस उंच इमारतींवर तैनात असतील.