Yogi Adityanath on Prime Minister of India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली होती. संघ मुख्यालयात त्यांची संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी बातचीत झाली. या भेटीबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यावर भाष्य करत म्हणाले की “येत्या सप्टेंबर महिन्यात मोदी ७५ वर्षांचे होत आहेत. ७५ वर्षांनंतर राजकीय जबाबदाऱ्यांमधून निवृत्ती घेण्याचा नियम स्वतः मोदींनीच बनवला आहे. त्यामुळे मोदी यांची निवृत्ती व त्यांच्या राजकीय वारसदाराबद्दल त्यांनी संघातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यांचा वारसदार महाराष्ट्रातील असू शकतो.”

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर देशभर एकच चर्चा सुरू झाली आहे. मोदींची निवृत्ती व त्यांच्या वारसदाराबद्दल तर्कवितर्क लावले जात असतानाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अनेकजण योगी आदित्यनाथ यांच्याकडे पुढचा पंतप्रधान म्हणून पाहतात, यावरही त्यांनी भाष्य केलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कधीपर्यंत काम करणार? योगी म्हणाले…

योगी आदित्यनाथ यांनी नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला उपयोगी (यूपी + योगी) म्हणतात, तसेच देशातील मोठा वर्ग तुम्हाला भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहतो, त्याबद्दल काय सांगाल? यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, “मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी भारतीय जनता पार्टीने मला इथे नेमलं आहे. तसेच, राजकारण हे काही माझं पूर्णवेळ काम (फुल टाइम जॉब) नाही. ठीक आहे आता इथे (राजकारणात) काम करतोय. परंतु, मी एक योगी आहे. आम्ही आहोत तोवर आहोत. कम करतोय, करत राहू.” यावर त्यांना विचारण्यात आलं की कधीपर्यंत हे काम करणार आहात? यावर योगी म्हणाले, “त्याचीही काही मर्यादा आहे.”

संजय राऊत काय म्हणाले होते?

“७५ वर्षांनंतर राजकारणातील पदांवरून निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवला आहे. त्यांच्या पक्षातील नेत्याचं वय ७५ वर्षे झाल्यानंतर त्याने सत्तेच्या पदावर राहू नये असा नियम त्यांनी बनवला आहे. ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेत्यांना हा नियम लागू केला होता. मोदी आता या नियमापलिकडे आहेत का?