आगामी लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपाप्रणित एनडीएविरुद्ध विरोधी पक्षांनी काही महिने आधीपासूनच सत्ताधारी भाजपाच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला देशातले १६ विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी १७ आणि १८ जुलै रोजी कर्नाटकच्या बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक पार पडली. यावेळी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र आले होते. या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA – इंडियन नॅशनल डेव्हलपमेन्ट इन्क्लुझिव्ह अलायन्स) असं नाव देण्यात आलं आहे.
विरोधकांच्या आघाडीला इंडिया हे नाव दिल्यापासून सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका सुरू आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलत असताना विरोधकांच्या आघाडीवर टीका केली. योगी आदित्यनाथ म्हणाले, त्यांना इंडिया नाही बोललं पाहिजे. ते नाव I.N.D.I.A. असं आहे. प्रत्येक अक्षरानंतर डॉट्स आहेत.
योगी आदित्यनाथ म्हणाले, कपडे बदलल्यामुळे पूर्वीच्या कर्मांमधून मुक्ती मिळत नाही. जनतेने यांच्या जुन्या करामती पाहिल्या आहेत. या करामती कोणाच्याही असोत, यूपीएच्या असो, काँग्रेसच्या असो अथवा समाजवादी पार्टीच्या असो किंवा अगदी आम आदमी पार्टीच्या असो, या कर्मांमधून मुक्ती मिळणार नाही. काय काय पराक्रम केले होते या लोकांनी. यामध्ये तृणमूल काँग्रेस असो अथवा सगळ्यांची परिस्थिती एकसारखी आहे.
हे ही वाचा >> Jaipur-Mumbai Express Firing : चेतन सिंहने गोळीबार का केला? लोहमार्ग पोलीस आयुक्त म्हणाले…
योगी आदित्यनाथ म्हणाले, हे लोक (विरोधक) कपडे बदलून देशाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, देशात लोकशाही आहे, लोकशाहीत राहणारे हे लोक परिपक्व आहेत.