गोरखपूर दुर्घटना होऊन अवघे काही दिवस उलटल्यानंतर योगी आदित्यनाथ सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गोरखपूरच्या बाबा राघव दास रूग्णालयात दोन दिवसांत ६० मुलांचा जीव गेला होता. त्यानंतर विरोधकांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली होती. मात्र, या सगळ्या घटनाक्रमानंतरही योगी आदित्यनाथ यांच्याकडून प्रशासनाला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

काल संध्याकाळी यासंदर्भातील सरकारी परिपत्रक जारी करण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनाही सुरक्षेच्यादृष्टीने यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक सुलखान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्ण जन्माष्टमी हा राज्यातील महत्त्वाचा सण आहे. त्यामुळे हा सण पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने साजरा केला जाईल, असे प्रशासनाकडून कळवण्यात आल्याचे सुलखान सिंह यांनी सांगितले.

योगी सरकारच्या या निर्णयावर आम आदमी पक्षाने (आप) टीका केली आहे. सरकारचा निर्णय म्हणजे खूप मोठी शोकांतिका आहे. यामधून सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसून येते. इतकी मोठी दुर्घटना घडली तरी ते आपला अजेंडा राबवूनच राहतील, असे ‘आप’च्या वैभव महेश्वरी यांनी म्हटले. इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही खासगीत अशाचप्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसल्या. मात्र, हिंदू संघटना अंगावर येतील या भितीने या नेत्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.

योगिक बालकांड

गोरखपूरच्या बी.आर.डी रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यानं झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूंमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. मागील एक महिन्यापासून ऑक्सिजन पुरविणाऱ्या कंपनीने बिल थकल्याचं बी.आर.डी. रूग्णालय प्रशासनाला वारंवार सांगितले होते. मात्र, त्याकडे रूग्णालय प्रशासनाने दुर्लक्ष केले. रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच ७० पेक्षा जास्त मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला. या सगळ्या प्रकरणी आता केंद्रानेही योगी सरकारकडे विस्तृत अहवालाची मागणी केली आहे.

गोरखपूर घटनेमागे कटकारस्थान; केंद्रीय मंत्र्यांना संशय

Story img Loader